लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उसने दिलेले १ लाख २० हजार रुपये परत करण्याच्या कारणावरुन एका २८ वर्षीय युवकाचा काठीने आणि चाकूने वार करुन खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी जुना जालना परिसरातील किल्ला जिनिंग परिसरात उघडकीस आली. कुमार शरदचंद्र झुंजूर (२८) रा. लक्ष्मीनारायणपुरा असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपी विजय तुळजाराम मुंगसे (३१) हा पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याच्या मुसक्या आवळल्या.आरोपी विजय मुंगसे याने काही दिवासापूर्वी मयत कुमार शरदचंद्र झुंजूर याच्याकडे १ लाख २० हजार रुपये ठेवण्यास दिले होते. दोन दिवसानंतर मुंगसे याने दिलेले पैसे मांगितले मात्र, पैसे देण्याची इच्छा नसल्याने मयत कुमार शरदचंद्र झुंजूर याने घरात ठेवलेली पैशाची पिशवी माझ्या वेडसर आई अथवा भावाने जाळून टाकले किंवा कोठेतरी फेकून दिल्याचे सांगितले. आपला मित्र आपल्याला खोटे बोलत आहे. पैसे देण्याची त्याची इच्छा नसल्याचे मुंगसे यांच्या लक्षात आले. यामुळे त्याने मित्राचा काटा काढण्याचा प्लॅन तयार केला.बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मस्तगड येथे भेटण्याचा बहाणा करुन मित्र झुंजूर याला फोन करुन बोलावून घेतले. तेथून रिक्षाने जिनिंग किल्ला परिसरात आल्यानंतर पुन्हा पैशाची मागणी केली, तेव्हाही त्याने नकार दिला. यामुळे बेसावध असलेल्या झुंजूर याच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. तो खाली पडताच मुंगसेने सोबत आणलेला खंजीर काढून पोटावर, छातीवर सात ते आठ वार करुन मित्राचा खून केल्याची कबूली आरोपी विजय मुंगसे याने पोलिसांना दिली.किल्ला जिनिंग परिसरात खून झाल्याची माहिती गुरूवारी सकाळी शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लोहकरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या निर्देशा नंतर तपासाची चक्र गतीने फिरली. आणि आरोपी जेरंबद झाला.नंतर पश्चात्तापपैशाच्या वादातून माझ्या जिवलग मित्राचा खून केल्याची कबुली आरोपी मुंगसे यांने पोलिसांना दिली. मात्र माझ्या हातून मित्राचा खून झाल्याचा पश्चात्ताप होत असल्याचे सांगून तो पोलिसांसमोर ढसाढसा रडला.
पैशाच्या वादातून युवकाचा भोसकून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:55 AM