गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दिवसें दिवस दुष्काळाचे ढग जिल्ह्यात गडद होत चालले आहे. जिल्ह्यात आतापासूनच टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढली आहे. दुष्काळी परिस्थिती बघता, आतापासूनच टँकर तयार करण्यासाठी फॅब्रिकेशनच्या दुकानावर गर्दी वाढली आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. जवळपास आठही तालुक्यात पावसाने हुलकावणी दिल्याने ऐन हिवाळ्यातच पाणी टंचाईचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहेत. हे चित्र उन्हाळ्यात वाढणार असल्याने पाण्यावर कोट्यवधी रुपयांचा होणारा खर्च बघता याचा फायदा घेण्यासाठी टँकर लॉबी सक्रिय झाली आहे. ५ हजार पासून ते ७ हजार लिटर पर्यंत टँकर तयार करण्यासाठी शहरातील फॅब्रिकेशनच्या दुकानावर टँकर तयार करण्यासाठी महिन्याभराची प्रतीक्षायादी असल्याचे दुकानदार सांगत आहेत.जिल्ह्यात सध्या ६८ टँकरव्दारे जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात जाफराबाद आणि भोकरदन तालुक्याचा समावेश आहे. पूर्वी गावात टँकर सुरु करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागत होती. आता जिल्हाधिका-यांचा भार कमी करुन ते अधिकार तालुक्याच्या उपविभागीय अधिका-याकडे दिले आहे. टँकरलॉबीवाल्यांनी याचा फायदा घेण्यासाठी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली असल्याची माहिती आहे. यासाठी अनेकांनी फॅब्रिकेशनच्या दुकानदाराला नव्याने काही टँकर तयार करण्यासाठी आॅर्डर्स दिल्याने फॅब्रिकेशनच्या दुकानात गर्दी दिसून येत आहे.पाऊस कमी झाल्याने शेतक-यांच्या विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह अन्य शेती कामांसाठी टँकरची गरज पडणार आहे. मध्यंतरी शासकीय टँकरला जीपीएस प्रणाली नसल्याने अडचण येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता सर्व शासकीय टँकरवर जीपीएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
पाण्याचे टँकर बनवून देण्यासाठी महिन्याभराची ‘वेटिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 1:01 AM