लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हवामानावर आधारित फळ पिकविमा वाटपात मोठा गोंधळ झाल्याचे पुढे आले आहे. ज्या कंपनीने हा विमा स्विकारला होता, त्या कंपनीकडून नुकसान भरपाईची रक्कम वाटप करतांना त्यात अनेकांवर अन्याय झाला असून, काही शेतकऱ्यांकडे फळबाग नसतानाही त्यांना विमा मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी करून जिल्हाधिका-यांनी न्याय द्यावा अशी मागणी आ. राजेश टोपे यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.एकीकडे दुष्काळ असल्याने आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्यावर्षी भरलेला पिकविमा आता कुठे पाठपुराव्या नंतर भेटला आहे. मात्र त्यातही अनेक तांत्रिक चुकांमुळे मोठा गोंधळ उडाला आहे. एकाच गावातील काहींची नावे मंजूर यादीत आहेत, तर काहींनी विमाहप्ता भरूनही तो त्यांना मिळालेला नाही. त्यामुळे शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिका-यांनी संबंधित कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांना जालन्यात बोलावून त्यांच्याकडून खुलासा मागणावा असेही सांगितले आहे. या गंभीर विषयात जिल्हाधिकारी तसेच शासनाने लक्ष न घातल्यास राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही टोपे यांनी दिला आहे.
मोसंबी पीकविमा वाटपात गोंधळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 12:46 AM