जालना - जालना ते औरंगाबाद असा ८० कि. मी.पर्यंत पाठलाग करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यात जनावरे चोरी करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीस शनिवारी जेरबंद केले. शेख समीर शेख शाकीर ऊर्फ कुरेशी (वय ४६. रा. सम्सनगर, शाहनूरवाडी, जि. औरंगाबाद) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जनावरे चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जनावरे चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. या गुन्ह्यांचा तपास करत असताना शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्यासुमारास नवीन मोंढा परिसरातून काहीजण कारमधून जनावरे चोरी करून सुसाट वेगाने गाडी घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून या गाडीचा जालना ते औरंगाबादपर्यंत पाठलाग केला. तसेच औरंगाबाद शहरातील अमरप्रित हॉटेल, कारडा कॉर्नर, उस्मानपुरा स्मशानभूमी रोड मार्गाने पाठलाग करत हनुमान मंदिर परिसरातील एका मोकळ्या जागेत स्कॉर्पिओ कार थांबलेली दिसली. त्याचवेळी गाडीमधील एकजण पळून जात असताना पथकाला दिसला. त्याला ताब्यात घेऊन नाव विचारले असता, त्याने शेख समीर शेख शाकीर ऊर्फ कुरेशी असे नाव सांगितले. तसेच इतर साथीदारांसह स्कॉर्पिओ गाडीत जनावरे चोरी करीत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी स्काॅपिओ गाडीची पाहणी केली असता, मागच्या बाजूला ठेवलेल्या दोन गाई व एक काळ्या रंगाचे वासरू, स्काॅर्पिओ गाडी असा ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याने साथीदारांच्या मदतीने जालना जिल्ह्यात जनावरे चोरीचे गुन्हे केले असून, पोलीस इतर साथीदारांच्या मागावर आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुभाष भुजंग, सपोनि. शिवाजी नागवे, सपोनि. पोहेकॉ. भाऊराव गायके, सॅम्युअल कांबळे, पोना. कृष्णा तंगे, सचिन चौधरी, देविदास भोजणे आदींनी केली.