लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अखिल भारतीय किसान सभेच्या मुंबई विधानभवनावरील लाँग मार्चला पाठिंबा म्हणून शेतमजूर युनियन आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अंबड चौफुलीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात शेतकरी, शेतमजुरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. भारिप बहुजन महासंघानेही या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.शेतमजूर युनियच्या जिल्हा कमिटी व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली अंबड चौफुली येथून साडेअकराच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात शेतकरी, मजूर महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी मोर्चेक-यांना अडविले. या वेळी मोर्चेक-यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जिल्ह्यातील हजारो मजुरांनी नमुना चार अर्ज भरून मनरेगाच्या कामाची मागणी केली. काम मिळविण्यासाठी लोकशाही मार्गाने सतत आंदोलने करून पाठपुरावा केला. मात्र, अद्याप मजुरांना काम मिळाले नसल्याचे या वेळी सांगण्यात आले. मजुरांऐवजी यंत्राच्या साहाय्याने काम करून घेणा-या अधिका-यांची चौकशी करावी, लाँग मार्चमधील मागण्या मान्य कराव्यात, शेतमालास दीडपट हमीभाव मिळावा, जलयुक्त ऐवजी मनरेगायुक्त शिवार ही संकल्पना राबवावी, विनाअट कर्जमाफी द्यावी, वन जमीन शेतक-यांच्या नावे करावी, समृद्धी महामाग प्रकल्प रद्द करावा या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना दिले. निवेदनावर अण्णा सावंत, मधुकर मोकळे, सरिता शर्मा, अनिल मिसाळ, रंगनाथ तांगडे, बंडू कनसे, शेख शकिला, बबन गाते, राहुल छडीदार, अनिल मिसाळ आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
जालना जिल्हा कचेरीवर धडकला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:21 AM