लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या पावसामुळे जालना जिल्ह्यातील ३ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी आता युध्दपातळीवर पंचनामे करून नुकसानीची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४० टक्के पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली. सोमवारी राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे नुकसानीचा आढाव घेतला.जिल्ह्यात कापूस, तूर, सोयाबीन, मका तसेच फळबागांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसनीचा आढावा घेण्यासाठी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली जात आहे. यासाठी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषीसहायक असे तीन कर्मचारी नेमले आहेत. या कर्मचा-यांनी आठही तालुक्यातील जवळपास चारशे पेक्षा अधिक गावांना भेटी देवून नुकसानीची माहिती एकत्रित केली आहे. यात प्रामुख्याने कपाशीचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. भोकरदन तालुक्यातील धावडा तसेच वालसावंगी आदी गावांमध्ये मकाचे पीकही पूर्णपणे नष्ट झाले आहे. एकीकडे शेतातील पाण्याचा वाफसा होत नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. अंतर्गत मशागत करण्यासाठी मजुरांना शेतात पाय ठेवणेही अवघड झाले आहे. अनेक शेतक-यांनी शाळू ज्वारीची पेरणी केली आहे. परंतु, सततच्या पावसामुळे या ज्वारीची वाढ खुंटली असून, शेतात गवत वाढण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून आले. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने पंचनामे सुरु केले आहेत. असे असलेतरी अद्याप शंभर टक्के पंचनामे पूर्ण झाले नसून यासाठी ८ नोव्हेंबर ही डेडलाईन दिली आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड, कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, उपसंचालक विजय माईनकर, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर आदींची उपस्थिती होती.जालना जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांप्रमाणेच परतीच्या पावसाचा डाळींबाच्या बागांनाही मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. त्यामुळे ७५ टक्क्यापेक्षा अधिक बागाचे नुकसान झाले आहे. आलेला बहार पूर्णपणे नष्ट झाल्याने या भागातील डाळींब बागाचेही तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सोमवारी अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी तसेच कृषी अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी या डाळिंब महासंघाचे राज्यसचिव डॉ. सुयोग कुलकर्णी यांच्यासह अन्य शेतक-यांनी केली आहे.
जिल्ह्यात ४० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 12:31 AM