जालना : शहरातील बहुतांश एटीएमसमोर ‘तांत्रिक अडचणींमुळे एटीएम सेवा बंद आहे’, असे फलक झळकत असल्याचे सोमवारी लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले. त्यामुळे चोवीस तास सेवा म्हणून एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाणा-यांना मनस्ताप सहन करावा लागला. अनेक एटीएमवर सुरक्षारक्षक नसल्याने एटीएम केंद्र रामभरोसे असल्याचे पाहावयास मिळाले.बँक ग्राहकांना पैसे काढण्यासाठी बँकेत येण्याची आवश्यकता भासू नये, बँकेस ग्राहकांच्या वेळेत बचत व्हावी, एटीएम वापणा-यांना हवे तिथे, हवे तेव्हा पैसे काढता यावे याकरिता जवळपास सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांनी शहरात ठिकठिकाणी एटीएम सेवा सुरू केली आहे. मात्र, ही सेवा ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ ठरत आहे. सोमवारी लोकमतने केलेल्या एटीएम सेवेच्या स्टिंग आॅपरेशनमध्ये शहरातील बहुतांश एटीमएम आॅऊट आॅफ सर्व्हिस असल्याचे समोर आले. जुना जालन्यातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या गांधी चमन चौक परिसरातील एचडीएफसी बँकेचे दोन्ही एटीएम बंद आहेत. स्टेट बँक आॅफ इंडिया, कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये सोमवारी खडखडाट होता. शनी मंदिरासह कचेरी रोडवरील बहुतांश एटीएमवर अशीच स्थिती पाहायला मिळाली. नवीन जालन्यात मुख्य बाजारपेठेत असलेल्या महावीर चौक ते मामा चौकापर्यंतची एसबीआय, आयसीआयसीआय, बँक आॅफ महाराष्ट्र, युनियन बँक या सर्व बँकांचे एटीएम बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे एटीएमवर पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. मामा चौकातील बँक आॅफ महाराष्ट्रचे एटीएम मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे या ठिकाणी तांत्रिक कारणांमुळे एटीएम सेवा बंद आहे, असा फलकच लावण्यात आला आहे. भोकरदन नाका परिसरातील एसबीआय, अॅक्सिस, कॉसमॉस, आयडीबीआय या बँकांच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्यांना बँक सॉरी कॅश नॉट अव्हॅलेबल, प्लीज व्हिजिट टू अनदर एटीएम, असे संदेश एटीएमच्या स्क्रीनवर पाहायला मिळत असल्याने ग्राहक वैतागले आहेत. कादराबाद, शिवाजी पुतळा, बडी सडक परिसरातील बहुतांश एटीएम बंद आहेत. त्यामुळे पैशाची तातडीने आवश्यकता असलेल्या अनेकांना बँकेत जावे लागले, तर काहींनी उसनवारीवर काम भागवले. चोवीस तास सेवा असलेल्या एटीएम गत काही महिन्यांमध्ये बहुतांश वेळेस बंदच राहत आहे. याबाबत बँकांकडे ग-हाणे मांडूनही उपयोग होत नसल्याचे ग्राहक सांगत आहेत.------------* एटीएममधून फाटक्या नोटाएटीएममधून को-या करकरीत नोटा मिळतील, या अपेक्षेने जाणाºया अनेकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. अनेकदा एटीएममधून शंभर रुपयांच्या फाटक्या, प्लॅस्टिक टेपने चिकटवलेल्या नोटा मिळत आहेत. एटीएममधून आलेली फाटकी नोट परत देण्याची सुविधा नसल्यामुळे पैसे काढण्यास गेलेली व्यक्ती उद्विग्न होऊन बाहेर पडत आहे. बँकांनी एटीएममध्ये कॅश भरताना फाटक्या नोटांचा वापर करू नये, असे एका ग्राहकाने सांगितले.---------------एटीएमची होतेय कचराकुंडीएटीएम मशीनच्या संगणक प्रणालीचे कामकाज व्यवस्थित सुरू राहावे, यासाठी एयर कंडीशन सेवा कायम सुरू ठेवणे आवश्यक आहे. मात्र, बहुतांश एटीएममधील एसी बंद आहे. नियमित साफसफाई होत नसल्याने एटीएम सेवा केंद्राला कचराकुंडीचे स्वरुप प्राप्त होत आहे. जिंदल मार्केटच्या कोपºयावरील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये अस्वच्छतेमुळे तेथे थांबणे नकोसे होत आहे.------------प्रतिक्रियापैसे काढण्यासाठी आज शहरातील चार एटीएमवर गेलो. मात्र, सर्वच एटीएमवर सेवा बंद असल्याचे दिसून आले. शेवटी बँकेत रांगेत उभे राहून पैसे काढावे लागते.- दत्ता जाधव, बँक ग्राहक
बहुतांश एटीएम यंत्रे ‘निर्धन’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:14 PM