घनसावंगी : तालुक्यात यंदा रेकॉर्डब्रेक पाऊस झाला असून, आजवर सरासरी ८७५.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा तालुक्यातील वार्षिक सरासरी पावसाने ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ओलांडली आहे. शिवाय घनसावंगी मंडळात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
घनसावंगी तालुक्यात वेळेत पाऊस आल्यामुळे यावर्षी प्रारंभीपासूनच सर्वच पिके जोमात होती. मात्र, सततच्या अतिवृष्टीने या सर्व पिकांची पूर्णत: वाट लागली आहे. तालुक्यात कापूस, तूर, सोयाबीन, बाजरी, मूग, उडीद ही पिके प्रामुख्याने पेरण्यात आली होती. मुगाचे पीक काढणीस आले असता सुरू झालेल्या पावसाने मोठे नुकसान केले. आता सोयाबीनला फुले व शेंगा लगडण्याच्या वेळेत पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे सोयाबीनही पिवळे पडले आहे. काही ठिकाणी संपूर्ण पीकच पाण्याखाली गेल्याने जागीच सडले आहे. शिवाय काही ठिकाणी जमिनी खरडली आहे. पुरामुळे अनेक मार्गांवरील पुलाचेही नुकसान झाले आहे.
सरासरी ८७५ मिमी पाऊस
यंदा घनसावंगी मंडळात सर्वाधिक ११७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ रांजणी मंडळात ११३०.७ मिमी, आंतरवाली मंडळात १११७.४ मिमी, तीर्थपुरी मंडळात १०६५.१ मिमी, राणी उंचेगाव मंडळात १०३२.१ मिमी, कुंभार पिंपळगाव मंडळात ९७१.६ मिमी, जांब समर्थ मंडळात ८७६.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत वार्षिक ६३८.४० मिमी पाऊस अपेक्षित होता. ही अपेक्षित सरासरी यंदा ऑगस्टच्या अखेरीस ओलांडली गेली आहे. तालुक्यात सरासरी ८७५.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी या वेळेपर्यंत ६१० मिमी पावसाची नोंद झाली होती.