जालना : अनैतिक संबधात अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने आईनेच आपल्या आठ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना भोकरदन तालुक्यातील दावतपूर येथे उघडकीस आली. यश रमेश मगरे असे मृत मुलाचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश मगरे हा सोमवारी दुपारपासून गायब होता. नातेवाईकांनी दिवसभर त्याचा शोध घेतला. परंतु, यश सापडला नाही यामुळे रात्री उशीरा भोकरदन पोलीस ठाण्यात याची तक्रार देण्यात आली. आज सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये यांनी या प्रकरणी दावतपूरला भेट देत चौकशी सुरु केली.
काही माहितीच्या आधारावर त्यांनी अविनाश जयकिरण मगरे (१९) याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. यावेळी अविनाश याने सोमवारी दत्ता साहेबराव घायवट व समाधान बाबूराव घायवट यांच्या मदतीने यशची हत्या केल्याचे कबुल केले. सोमवारी हत्या केल्यानंतर त्यांनी यशचा मृतदेह शेतातील एका झुडपात ठेवला. त्यानंतर सकाळी त्यांनी यशचा मृतदेह विहिरीत टाकला. दरम्यान, आतापर्यंत यशच्या आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी सुनिल जायभाये, पोनि. दशरथ चौधरी, पोलीस कर्मचारी गणेश पायघन, शेख आसेफ, रामेश्वर शिनकर यांनी भेट दिली.