लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात होऊन दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. तरीही शहागड येथील बागवान समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. यामुळे संतप्त समाजबांधवानी उड्डाणपुलाचे काम बंद पाडून ठिय्या आंदोलन केले.औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात बागवान समाजाची स्मशानभूमीची जागा संपादित केली आहे. स्मशानभूमीसाठी जागा देण्यात येईल असे संपादन करताना आश्वासन देण्यात आले होते. मात्र दोन वर्षाचा कालावधी उलटूनही यावर अद्यापही कुठलाच निर्णय झाला नाही. याबाबत महामार्गाचे काम करत असलेल्या संबंधित कंपनीचे पदाधिकारी, महसूलचे अधिकारी आणि समाजबांधवांत अनेक वेळा जागेविषयी बैठका झाल्या. मात्र तोडगा निघू शकला नाही. निव्वळ आश्वासन देण्यात येत असल्याचे समाजबांधवांचे म्हणणे आहे. परिसरात महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे. स्मशानभूमीच्या जागेवर उड्डाणपूल होत आहे. संपादित केलेली जमिनीच्या मोबदल्यात तितकीच जागा परिसरात इतरत्र देण्यात यावी या मागणीसाठी बागवान समाजबांधवांनी उड्डाणपुलावर बुधवारी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. यामुळे दोन दिवसांपासून उड्डाणपुलाचे काम ठप्प आहे.बागवान समाजाच्या मागणीसाठी जानेवारीत महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बागवान समाज बांधव व आयआरबी कंपनीचे पदाधिकारी, तसेच महसूलच्या अधिकाºयांची बैठक होऊन वाळेकेश्वर परिसरातील गट क्रमांक ९ मधील जीवन प्राधिकरणाची जागा निश्चित करण्यात आली आहे. जागेवरुन सुरु झालेल्या राजकीय श्रेयामुळे जागा मिळेल की नाही. या बाबत समाजबांधवात साशंकता असल्याने बागवान समाजबांधवानी यावर तातडीने निर्णय घेऊन स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली. यावेळी अध्यक्ष अबू हुरेरा, अर्शद चौधरी, पं.स.निसार बागवान, यावेळी तलाठी कृष्णा मुजगूले, आयआरबी कंपनीचे धनराज परित, पाठक, प्रदीप कांबळे, सुरेंद्र सावळकर, चिनप्पा आदी अधिकारी उपस्थित होते.तहसीलदारांना निवेदनदरम्यान वाळकेश्वर येथील दलित व वडार समाजाच्या ग्रामस्थांनी तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांना घेराव घालत गट.न. ९ मधील जीवन प्राधिकरणाची जमीन स्मशानभूमीसाठी देण्याकरिता विरोध केला.तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांनी महसूलच्या पथकासह जिवण प्राधिकरणाच्या जागेची पाहणी केली, यावेळी बागवान समाजाच्या अनेक ग्रामस्थांनी तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांना निवेदन दिले व जोपर्यंत स्मशानभूमीसाठी दुसºया जागेचे मोजमाप करुन देत नाहीत, तोपर्यंत जुन्या स्मशानभूमीतील उड्डाणपुलाचे काम चालू देणार नाही असा पवित्रा घेतला.
स्मशानभूमीच्या जागेसाठी बागवान समाजाचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 1:14 AM