पवन पवार, वडीगोद्री ( जालना) : उद्यापासून(दि.6 जुलै) मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांची मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात शांतता रॅली सुरू होणार आहे. तत्पुर्वी आज(दि.5) अचानक खासदार अशोक चव्हाण आणि खासदार संदिपान भुमरे यांनी अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये सूमारे तासभर चर्चा चालली.
या तिघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप कळू शकले नाही. अशोक चव्हाण आणि संदिपान भुमरे जरांगेंच्या भेटीला अचानक आल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. या चर्चेदरम्यान मनोज जरांगे पाटील हे फोन वर कुणाशी तरी बोलत असताना पहायला मिळाले. जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.
दरम्यान, आज दुपारी मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधून बाळासाहेब सराटे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. सगेसोयऱ्यांची मागणी फक्त जरांगे पाटील करत आहे. ही मागणी त्यांच्या डोक्यात कोणत्या कायदे तज्ञांनी घातली, माहिती नाही, असे बाळासाहेब सराटे म्हणाले होते. यावर जरांगे पाटील पुढे म्हणाले, सगेसोयरेची अधिसूचना काढताना वाशीमध्ये तुम्ही होतात तेव्हा गोड वाटलं. तुम्हाला वाटतं ओबीसीपेक्षा ईडब्ल्यूएस आरक्षण चांगल आहे. कशाला ते १६ टक्के आरक्षण चॅलेंज केलं? मराठा समाजाला, मला ढ समजता का? सरकारने तुम्हाला आमिष दाखवला असेल. अजूनही वेळ गेली नाही, मराठा अभ्यासकांनी अंतरावली सराटीत येऊन चर्चा करावी, असे आवाहनदेखील मनोज जरांगे यांनी केले आहे.