- फकिरा देशमुख
भोकरदन ( जालना ) : औरंगाबाद-जालना लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा खासदार राहिलेले पुंडलिक हरी दानवे ( Pundalikrao Hari Danve) ( ९५, रा. पिंपळगाव सुतार तालुका भोकरदन जिल्हा जालना) यांचे सोमवारी सकाळी दहा वाजता औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर एक महिन्यांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. पुंडलिकराव हरी दानवे सर्वत्र पीएचडी या टोपण नावाने प्रसिद्ध होते.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारे पुंडलिकराव दानवे यांची जडणघडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघात झाली. त्यांनी आपल्या राजकीय जीवनाला भारतीय जनसंघाच्या माध्यमातून सुरुवात केली. १९६७ झाली ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव सुतार या गावचे पंधरा वर्ष सरपंचपद भूषविले. त्यानंतर पंचायत समिती भोकरदन च्या निवडणुकीतही त्यांनी विजय संपादन केला. मात्र, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवत विजय प्राप्त केला आणि पुन्हा मागे वळून पाहिले नाही.
दोनवेळा राहिले खासदार जालना जिल्हा औरंगाबादमध्ये असताना त्यांनी काँग्रेसचे बाबुराव काळे यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली. पाच वेळा जालना लोकसभा मतदार संघातून त्यांनी भारतीय जनसंघ व नंतर भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यात त्यांना दोन वेळा यश आले. १९७७ मध्ये जनता दलाच्या लाटेमध्ये ते खासदार होते. त्यानंतर १९८९ मध्ये अल्प काळ राहिलेल्या लोकसभेचे सदस्यत्व भूषविण्याचा मानही त्यांना मिळाला होता. १९८९ ची लोकसभा बरखास्त झाल्यानंतर त्यांनी खासदारांना मिळत असलेला रेल्वे सवलतीचा पास जमा करून दिल्ली ते औरंगाबाद असा सर्वसाधारण दर्जाच्या डब्यातून प्रवास केला होता. व्ही.पी.सिंग सरकार अल्पमतात आल्यानंतर त्यांना फोडण्याचा ही प्रयत्न झाला होता. परंतु, त्यांनी आपल्या निष्ठा भारतीय जनता पक्षासोबत कायम ठेवल्या होत्या.
भाजपला सोडचिठ्ठी, राष्ट्रवादीत प्रवेश भोकरदन विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मुलगा चंद्रकांत दानवे यांना भाजपाने उमेदवारी दिली नाही त्यावरून त्यांचे भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन, विद्यमान केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी मतभेद झाले. यातून त्यांनी भाजपचा राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने चंद्रकांत दानवे यांना उमेदवारी दिली. अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत चंद्रकांत दानवे निवडुन आले होते. त्यापूर्वी भाजपाने लोकसभा निवडणुकीत पुंडलिकराव दानवे यांच्या ऐवजी उत्तमसिंग पवार यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी सुध्दा त्यांनी भाजपा श्रेष्ठींवर गंभीरस्वरुपाची टीका केली होती.
सर्वपक्षीय नेत्यांशी होता जिव्हाळा मुलुख मैदानी तोफ म्हणून त्यांची राजकीय ओळख होती. तसेच बस आणि रिक्षाने प्रवास करणारा खासदार म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती. राजकारणात एवढ्या मोठ्या अत्युच्च पदावर राहूनही त्यांनी आपली साधेपणाची वर्तणूक कधीच बदलली नाही. भारतीय जनसंघाचे तत्कालीन नेते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, नानाजी देशमुख, कुशाभाऊ ठाकरे, सुंदर सिंह भंडारी, दत्तोपंत ठेंगडी, कर्नाटक केसरी जगन्नाथ जोशी, यादवराव जोशी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सोबतही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
चार दिवसांपूर्वीच झाले होते पत्नीचे निधन पुंडलिकराव दानवे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या पत्नी केशरबाई दानवे (८६ ) यांचे २८ ऑक्टोंबर रोजी निधन झाले होते. त्यांच्यावर २९ ऑक्टोंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्नीच्या निधनानंतर अवघ्या चार दिवसातच पुंडलिकराव दानवे यांचेही निधन झाले. दानवे यांच्यावर त्यांच्या मूळगावी पिंपळगाव सुतार तालुका भोकरदन येथे मंगळवारी (दि. २) दुपारी साडेबारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा राष्ट्रवादी काँग्रेस भोकरदनचे माजी आमदार चंद्रकांत दानवे, पिंपळगाव सुतार येथील माजी सरपंच बबनराव दानवे सुधाकर दानवे, कन्या जिजाबाई जाधव, जावई-सुना, नातवंडे असा परिवार आहे.
'शरद पवारांनी आदेश द्यावा, जालना लोकसभा लढवतो'; ९२ व्या वर्षी पुंडलिकराव दानवेंनी केली होती गर्जना