आंबा (जि. जालना) : एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास आंबा येथे घडली. अशोक सोनाजी घुले (३०, रा. आंबा) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. दरम्यान, अशोकला पीएसआय होयचे होते; परंतु त्याच्या मृत्यूने हे स्वप्न अधुरेच राहिले आहे.
येथील सोनाजी घुले यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांना पाच एकर शेती आहे. एक मुलगा अशोक हा गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबाद येथे एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करत होता. त्याला पोलीस उपनिरीक्षक बनायचे होते. काही दिवसांवर एमपीएससीची परीक्षा आली होती; परंतु गतवर्षीप्रमाणेच यंदाही परीक्षा रद्द होईल का, याची चिंता त्याला होती. दोन दिवसांपूर्वीच अशोक हा आंबा येथे आला होता. बुधवारी आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी तो शेतात गेला. चार वाजेच्या सुमारास त्याच्या छातीत दुखू लागले. तो एका झाडाखाली बसला असता, त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे घुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशोकचे पीएसआय बनन्याचे स्वप्न अधुरेच राहिल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.