जालना - मिस्टर जरांगे, तुम्हाला आरक्षणातलं ०.० सुद्धा नॉलेज नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्ष पूर्ण झाली. पण मंडल आयोग इंप्लिमेंट होऊन २७-२८ वर्षं झाली आहेत आणि ७० टक्क्यांचा जावई शोध जरांगे काढला कुणी? म्हणून मी कायम सांगतो जरांगे, तुझी, तुमची लायकी नाही माझ्यासमोर बोलण्याची. मंडल आयोग १९९३-९४ ला इम्पलिमेंट झाला आणि ७० वर्ष आणली कुठून? याला शिक्षण द्या आधी, याला पॉलिसी शिकवा आधी. असे म्हणत, ओबीसी आरक्षणाचे नेते लक्षमण हाके यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर थेट हल्ला चढवला. ते जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे पत्रकारांसोबत बोलत होते.
हाके म्हणाले, "माझी चिडचीड होतीये मान्य आहे. मी एकेरी बोलतोय. या वेदना आहेत आमच्या. म्हणून हे शब्द येत आहेत माझ्याकडून. त्यामुळे ७० वर्ष कुणाचे खाण्याचा प्रश्नच येत नाही आणि २७-२८ वर्षांत काय मिळाले आम्हाला? लक्ष देऊन सर्वांनी ऐका. ते नेहमीच आमचे ओबीसी नेते छगन भुजबळ यांना लक्ष करताना म्हणतात की, भुजबळ तू सगळ खाल्लय. या जरांगेंना माझा एक सवाल आहे, या महाराष्ट्रात कालचं बजेटसुद्धा, म्हणजे अगदी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरसुद्धा, ६० टक्के ओबीसींना १०० टक्क्यांपैकी १ टक्का बजेटही या महाराष्ट्राने राबवले नाही.
"जरांगे यांच्या जातीवादासंदर्भातील विधानावर बोलताना हाके म्हणाले, जरांगे तुम्ही म्हणताय, जातीवाद केला नाही. भुजबळ असतील, लक्षमण हाके असेल, महादेव जाणकर असतील, गोपिचंद पडळकर असतील, मुंडे बंधू भगिणी असतील, वडेट्टीवार असतील, ही माणसं जाती उपजातींसह महाराष्ट्रातील ४९२ जातींची भाषा बोलतात आणि तुम्ही केवळ एकाच जातीची भाषा बोलत आहात. मग नक्की जातीयवादी कोण?" असा सवालही यावेळी हाके यांनी जरांगेंना केला.