परतूर येथे पाच जणांकडून मारहाण
जालना : तू आमच्या जमिनीवर पाय का ठेवला म्हणून पाच जणांनी मारहाण केल्याची घटना परतूरजवळ घडली. याप्रकरणी शेख अमीर हाफिज शेख यांच्या फिर्यादीवरून शेख इम्रान शेख मुस्तफा शहा, अमीर मुस्तफा शहा, गुड्डू मुस्तफा, सय्यद मुस्तफा, मन्नी मुस्तफा यांच्याविरुद्ध परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुंभार पिंपळगाव येथे उद्या रक्तदान शिबिर
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथे शिवजयंतीनिमित्त शुक्रवारी सकाळी ९ वाजता भोसले काॅम्प्लेक्स, राजाटाकळी रोड येथे जनकल्याण रक्तपेढी जालना यांच्यामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बाळराजे आर्दड, गणेश ओझा, सदानंद आर्दड, गजानन आर्दड, बाळासाहेब आर्दड, वसंत पवार आदी उपस्थित राहणार आहे.
धमकी दिल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा
जालना : शेतातून उसाची टायरची गाडी घेऊन जाऊ नका, असे म्हणून टायरगाड्या अडवून धमकी दिल्याप्रकरणी एकाविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी शिवारात घडली आहे. याप्रकरणी अप्पा सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन
अंबड : शहरातील नागरिकांना रमाई घरकूल योजना व पंतप्रधान आवास योजनेतून घरकूल मंजूर झालेले आहे. परंतु, वाळू मिळत नसल्याने कामे ठप्प आहे. तातडीने वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. यावेळी शहरप्रमुख कुमार रुपवते, अमोल ठाकूर, रमेश वराडे, बाबू लांडे, दत्ता मुर्तडकर, रवी इंगळे, सुरेश राजपूत आदी उपस्थित होते.
दीपक कोल्हे यांचा केला सत्कार
जालना : जिल्हा सरकारी अभियोक्तापदी जालना येथील ॲड. दीपक कोल्हे यांची नियुक्ती झाली आहे. याबद्दल भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष राजेश राऊत यांनी कोल्हे यांचा सत्कार केला. कोल्हे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी प्रा. राजेंद्र भोसले, संजय देठे, शांतीलाल राऊत, ॲड. रोहित बनवसकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती. या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.
महिला स्वयंमसुरक्षा प्रशिक्षण शिबिर
जालना : त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आनंदनगर येथील लॉर्ड बुद्धा मैदानावर भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलातर्फे बालसंस्कार, महिला स्वयंमसुरक्षा प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र बनकर यांच्या हस्ते करण्यात आले. समता सैनिक दलाचे मेजर जनरल आनंदा भेरजे, मेजर दीपक दाभाडे यांनी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले.यावेळी महिलांची उपस्थिती होती.
भाजप महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर
जालना : भाजप महिला मोर्चाची शहर कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली. कार्यकारिणीत सरचिटणीस गीता राजगुडे, उपाध्यक्षा शीतल झंवर, किरण लाहोटी, रेखा मुंदडा, चिटणीस प्रीती पालीवाल, सुनीता चौधरी, वीणा जाफराबादकर, सरोज बाहेती, सिद्धांत टीकारिया, उपाध्यक्षा दिवा बाहेती, पल्लवी गिल्डा, सदस्य मधुमती बिर्ला, कविता मुथा, रुपाली बुरसे, सुमित्रा चिकणे, आरती तोहणीवाल, रेखा राठी आदींची निवड करण्यात आली.