लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील रेल्वेस्टेशनसह इतर भागातील मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणावर पालिकेने हातोडा मारला. पोलीस बंदोबस्तात शनिवारी सकाळपासून पालिकेने कारवाई मोहीम हाती घेताच अनेकांनी आपापली दुकाने हटविली. सायंकाळपर्यंत ५० हून अधिक अतिक्रमणे हटविण्यात आली होती.जालना शहरातील प्रमुख मार्गासह रेल्वे स्टेशन, नूतन वसाहत, अंबड चौफुली रोड, शनी मंदिरासह इतर भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीसह इतर समस्या वाढल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन नगर पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. पालिकेच्या पथकाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात शनिवारी सकाळीच अतिक्रमणे हटविण्यास सुरूवात केली. नगर पालिकेचे पथक अतिक्रमणावर हातोडा मारत असल्याचे पाहून अनेक व्यावसायिकांनी आपापले गाडे, टपऱ्या, दुकाने स्वत: काढण्यास सुरूवात केली होती. पालिकेच्या अधिकाऱ्यांसह ३० कर्मचारी, ५ ट्रॅक्टर, १ जेसीबी अतिक्रमण हटविण्यासाठी कार्यरत होती. कदीम पोलीस ठाण्याचे पोनि देविदास शेळके, सपोनि देविदास सोनपवळे यांच्यासह १५ कर्मचारी बंदोबस्त कामी तैनात होते. सहायक पोलीस अधीक्षक तांबे यांनीही या कारवाईच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. शहरातील रेल्वे स्टेशन, नूतन वसाहत, अंबड चौफुली रोड, शनि मंदिर आदी भागात शनिवारी दिवसभर ही मोहीम राबविण्यात आली.नगर पालिकेने हाती घेतलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत संबंधित अतिक्रमणधारकांमधून संताप व्यक्त केला जात होता. व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही अनेकांनी केली आहे.शनिवारी हटविण्यात आलेल्या अतिक्रमणांमधून हातावर पोट असलेल्या व्यापा-यांवर गदा आली आहे. परंतु, अनेक भागातील मोठमोठी अतिक्रमणे कायम आहेत. अनेक भागांमध्ये सार्वजनिक नाल्यांवर बांधकाम झाले आहे. त्यामुळे नाल्यांची रूंदी कमी होऊन पावसाळ्यात रस्त्यांना तलावाचे स्वरूप येते. त्यामुळे पालिकेने ही मोहीम राबविताना जेथे अनधिकृतरीत्या बांधकाम झालेले आहे तेथेही कारवाई करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.१५ दिवसांची मोहीमनगर पालिकेच्या पथकाकडून सलग १५ दिवस ही मोहीम राबविली जाणार असल्याचे सांगण्यात आले. शनिवारी या मोहिमेस प्रारंभ झाला असून, अतिक्रमणधारकांनी आपापली अतिक्रमणे हटवावीत, अशा सूचना पालिकेच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 12:56 AM