जालना : पाणीपाऊच व प्लॅस्टिक कॅरीबॅगमुळे शहरातील नाल्यांचा श्वास कोंडला आहे. नाल्यांची पाणी रस्त्यावर येत असून, सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे उत्पादक कंपन्यांनी पाणी पाकिटांची योग्य विल्हेवाट लावावी. अन्यथा प्लॅस्टिक कॅरीबॅग वापर व विक्री अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा आशयाच्या नोटिसा पालिकेने बुधवारी आठ कंपन्यांना बजावल्या आहेत.स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत शहर स्वच्छतेसाठी पालिकेकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. इतर जिल्ह्यात कुठेही न दिसणारी पाणीपाऊच संस्कृती जालन्यात पाहावयास मिळते. कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर काहीही न विचारता पाणीपाऊच समोर ठेवले जाते. लग्न, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, मोर्चे, मिरवणुका यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीपाऊच वाटप केले जाते. त्यामुळे पूर्वी केवळ जारच्या माध्यमातून पाणीविक्री करणा-या कंपन्यांनी आता पाणीपाऊच विक्रीवर भर देण्यास सुुरुवात केली आहे. उत्पादक, वितरक, ग्राहक अशी एक साखळीच पाणीपाऊच संस्कृतीमुळे तयार झाली आहे. यामुळे शहराचे स्वरुप मात्र बदलले आहे. हॉटेलबाहेरील परिसरात, शहरातील रस्त्यांसह नाल्यांमध्ये सर्वत्र पाऊच दिसत आहेत. शहरात निघणा-या एकूण कच-यापैकी सर्वाधिक कचरा प्लॅस्टिक कॅरीबॅग व पाणीपाऊचचा आहे. शहरात प्लॅस्टिक कच-याने गंभीर स्वरुप घेतले आहे. याला प्रतिबंध घालण्याचे मोठे आव्हान नगरपालिका प्रशासनासमोर आहे. त्यामुळे नगरपालिकेने महाराष्ट्र प्लॅस्टिक पिशव्यांचे उत्पादन, विक्री, वापर व विल्हेवाट अधिनियमाच्या उल्लंघन प्रकरणी ५० हजारांचा दंड लावून गुन्हे दाखल करण्यात का येऊ नये, असे खांडेकर यांनी सांगितले. तशी नोटीसही उत्पादकांना देण्यात आली आहे. तीन दिवसांत खुलासा सादर करून, पाणीपाऊचची विल्हेवाट लावावी, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असे नोटिसीत नमूद आहे.-----------पाणी पाऊचची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी उत्पादक कंपन्यांचीच आहे, हे कंपनीच्या संचालकांना बैठकीत सांगण्यात आले. उत्पादकांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या पुढे पाणीपाऊचची विल्हेवाट न लावणाºया उत्पादक व विके्रत्यांवर कारवाई करण्यात येईल.संतोष खांडेकर, मुख्याधिकारी न.प. जालना