लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : तालुक्यातील शेलगाव येथील संजय अंभोरे यांच्यावर गोळीबार करून हत्या केल्याप्रकरणी राजेवाडी (ता. बदनापूर) येथील तीन संशयित आरोपींसह अन्य दोन अशा एकूण पाच आरोपींविरूध्द बदनापूर पोलीस ठाण्यात मंगळवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी गाव बंद ठेवण्यात आले होते.तालुक्यातील शेलगाव येथील संजय किसनराव अंभोरे (४२) यांची सोमवारी सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात गोळी घालून हत्या केली होती. या प्रकरणी राजू किसनराव अंभोरे यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, माझा भाऊ संजय अंभोरे हा जालना एमआयडीसीत गेल्या दहा ते बारा वर्षांपासून लेबर कंत्राटदार म्हणून काम करीत होता़ २०१७ मध्ये ‘लेबर सप्लायचा ठेका करू नको’ या कारणावरून त्यास मारहाण करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. त्यावेळी मयत संजय अंभोरे यांच्या तक्रारीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात पाच आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता.सदरचे प्रकरण न्यायालयात सुरू असून, दीड महिन्यापूर्वी संजय यांना फोनवर धमक्या येत असल्याचा अर्जही दिलेला आहे़ सहा ते सात महिन्यांपूर्वी संजय हा लेबर ठेकेदार असल्याने जालना येथील एकाने उत्तम घुनावत, मदन खोलवाल, सुमेरसिंग काकरवाल यांच्या नादाला लागू नकोस, नसता तुला मी पाहून घेईन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर प्रकरणी एक बैठक घेऊन समेटही घडल्याचे संजय अंभोरे यांनी सांगितले होते़ दीड महिन्यापूर्वी संजय यांच्यासोबत मजूर म्हणून काम करीत असलेला विजय सुंदरडे यास मदन खोलवाल उत्तम घुनावत व इतरांनी तू संजय अंभोरे या ठेकेदारासोबत का राहतो, असे म्हणून मारहाण केली होती.तू संजय ठेकेदारासोबत राहू नकोस नसता तुम्हाला पाहून घेऊ, अशी धमकी दिली होती़ त्याबाबत विजय सुंदर्डे याने भाऊ संजय अंभोरे सोबत पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारही दिली होती़ सोमवारी सायंकाळी ७़४० वाजेच्या सुमारास मी घरी जात असताना मला रस्त्याने फटाक्या सारखा आवाज आला. काय झाले म्हणून मी माघारी फिरलो असता मला स्वराज्य पान कॉर्नर येथे टपरीत माझा भाऊ संजय अंभोरे हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.तेथे बरेच लोक जमलेले होते मला आनंद अंभोरे याने कळविले की, मी व संजय टपरीत बसलो असताना मोटार सायकलवर दोन अज्ञात इसम आले. ज्यापैकी एकाच्या अंगात काळ्या रंगाचे जॅकीट, मध्यम बांध्याचा, तोंडाला कापडा बांधलेला होता. त्याचा चेहरा दिसू शकला नाही, तर दुसरा इसम मध्यम बांध्याचा त्याच्या अंगात फिक्कट पिवळ्या रंगाचा टी शर्ट होता. त्याने सुध्दा तोंडाला कपडा बांधलेला होता. त्यामुळे त्याचाही चेहरा दिसला नाही.घटनेनंतर अमोल अंभोरे, गजानन अंभोरे यांनी त्यांचा पाठलाग केला असता. पुन्हा दोन गोळया त्यांच्या दिशेने झाडल्या आणि ते मोटारसायकलवर बसून निघून गेल्याचे नमूद केले आहे. या फिर्यादीवरून सुमेरसिंग काकरवाल ठेकेदार, उत्तम घुनावत ठेकेदार, मदन खोलवाल (रा. राजेवाडी ता. बदनापूर) व इतर दोन अनोळखी आरोपींविरूध्द गुन्हा दाखल झाला.संजय अंभोरे यांची हत्या झाल्यानंतर मंगळवारी सकाळपासून बदनापूर पोलीस ठाण्यात संजय अंभोरे यांचे नातेवाईक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.त्यांनी या हत्येसंदर्भात संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा आरोपींना अटक करावी नसता आम्ही येथेच आंदोलन करू असा पवित्रा घेतला होता ग़ुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून सुमेरसिंग काकरवाल ठेकेदार, उत्तम घुनावत ठेकेदार, मदन खोलवाल या तिघांना ताब्यात घेतले आहे.शटरला एक गोळी लागलीसंजय अंभोरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी धावलेल्या दोघांवर या हल्लेकरूंनी दोन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी येथील एका शटरला छिद्र पाडून आरपार गेली.या हत्येसंदर्भात संजय अंभोरे यांचे भाऊ राजू अंभोरे व इतर ग्रामस्थांनी पोलीस महानिरीक्षकांच्या नावे बदनापूर पोलीस ठाण्यात एक निवेदन दिले आहे. त्यामधे नमूद केले की, माझा भाऊ संजय अंभोरे याने संबंधित आरोंपीकडून जिवाला धोका असल्याचे व आरोपीकडे गावठी कट्टा असल्याची तक्रार केली होती़ संबंधित आरोपींविरुध्द संबंधित पोलीस अधिकऱ्यांनी प्रतिबंधत्मक कारवाई केली नाही म्हणून चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे़
संजय अंभोरे हत्येप्रकरणी पाच आरोपींविरुध्द खुनाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 12:59 AM