आष्टी : विना पाण्याची दारू पिण्याच्या कारणातून वाद झाल्याने परतूर तालुक्यातील वरफळ येथील ३८ वर्षीय व्यक्तीचा दैठणा (ता परतूर) शिवारात दारूच्या नशेत खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खोदकाम सुरू असलेल्या विहरीत फेकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात मृताच्या भावाने शनिवारी दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी सांगितले, की खून झालेले शेख मुनवर शेख नूर (३८) हे गुत्तेदारी पद्धतीने विहिरींचे खोदकाम करायचे. त्यांचे दैठणा शिवारात विहीर खोदण्याचे काम सुरू होते. दैठणा येथील रमेश तायडे यांनी शेख मुनवर व त्यांचा मित्र माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर आढाव यांना गुरुवारी रात्री दैठणा येथील शेतात जेवणासाठी बोलावले. दोघे रात्री जेवणासाठी गेले असता, त्या ठिकाणी विहिरीवर खोदकाम करणारे सहा ते सात मजूरही होते. तायडे यांनी दारू व मटणाचा बेत आखला होता. सर्व जण दारुपीत असताना तायडे यांनी शेख मुनवर व आढाव यांना पाणी न टाकता दारु पिण्याचा आग्रह धरला. त्यामुळे शेख मुनवर, रमेश तायडे व ज्ञानेश्वर आढाव यांच्यात वाद झाला. त्यामुळे आढाव हे गावाकडे निघून गेले. शेख मुनवर तेथेच होते. रमेश तायडे व इतर सहा ते सात जणांनी दारु पिण्याच्या कारणावरून व गुत्तेदारीच्या कारणावरून शेख मुनवर यांचा खून करून मृतदेह विहिरीत टाकला. या प्रकरणी मयताचा भाऊ शेख सरवर शेख नूर यांच्या फिर्यादीवरून संशयित सखाराम रामचंद्र खरात, शिवाजी कठाळू सोळंके, सिद्धार्र्थ गुणाजी शेजूळ, बद्रीनाथ दौलतराव पारखे (सर्व.रा. साखळगाव,ता.परतूर) रमेश रख्माजी तायडे (रा.दैठणा) यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन परतूर न्यायालयात हजर केल असता, न्यायालयाने त्यांना १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार हे करत आहेत.-------------असा झाला घटनेचा उलगडाशुक्रवारी दैठणा शिवारात विहिरीचे खोदकाम सुरू असताना,शेख मुनवर यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, रात्री गावाकडे परत गेलेले ज्ञानेश्वर आढावा यांनी घडलेला सर्व प्रकार शेख मुनवर यांचा भाऊ सरवर शेख व पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.
दारूच्या वादातून एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:31 AM