तीर्थपुरी (जि. जालना) : घनसावंगी तालुक्यातील सरफगव्हाण येथे घराच्या वादातून माजी पंचायत समिती सदस्याचा खून केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. कैलास गोविंद चव्हाण (४८), असे मयताचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
घनसावंगी तालुक्यातील सरफगव्हाण येथील मयत कैलास गोविंद चव्हाण यांनी गावालगत असलेल्या नंदू नागोसिंग पवार यांचे घर विकत घेतले होते. हे घर विकत घेण्यास घरमालकाचा चुलत भाऊ राजू बाबूसिंग पवार व बाबूसिंग शंकरसिंग पवार यांचा विरोध होता. यावरून कैलास चव्हाण व राजू पवार, बाबूसिंग पवार यांच्यात नेहमी वाद होत होता. सोमवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास राणी उंचेगाव ते परतूर रस्त्यावरील एका टपरीजवळ कैलास चव्हाण व राजू पवार, बाबूसिंग पवार यांच्यात हाणामारी झाली. राजू पवार याने कैलास चव्हाण यांच्या डोक्यात फावड्याने वार केले. यात चव्हाण हे गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. याची माहिती नातेवाइकांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
नातेवाईक येताच, आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी मयताचा भाऊ ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून संशयित राजू पवार व बाबूसिंग पवार यांच्याविरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई सपोनि. पतंगे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग माने यांनी केली.