जालना : प्रेमात अडसर ठरणाऱ्या बालकाचा खून करणाऱ्या आरोपीस अंबड येथील जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नवनाथ ऊर्फ नव्या शामराव जगधने (२५ रा. कातपूर, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी नवनाथ जगधने व एका महिलेचे प्रेम संबंध होते. त्यांच्या संबंधात सहा वर्षांचा मुलगा अडसर ठरत होता. १४ ऑगस्ट २०२१ रोजी अंबड शिवारातील घनसावंगी रोडवर उसाच्या शेतामध्ये आरोपी नवनाथ जगधने, संशयित गणेश भाऊसाहेब उघडे व एक महिला यांनी कट रचून सहा वर्षांच्या मुलाचा खून केला होता. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सदरील प्रकरणात अभियोग पक्षातर्फे २१ साक्षीदार तपासण्यात आले.
साक्षीदारांचा पुरावा व सरकार पक्षातर्फे व्ही. एन. चौकीदार यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी नवनाथ जगधने यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तर अन्य आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे व्ही. एन. चौकीदार यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी बळीराम खैरे, संजय राठोड, उषा अवचार यांनी मदत केली. सदरील प्रकरणामध्ये तपासिक अंमलदार म्हणून पोलिस उपनिरीक्षक एस. पी. चाटे, पोनि. एस. डी. हुंबे, सपोनि. नरके यांनी काम पाहिले.