लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील रूक्मिणी परिवाराच्यावतीने हिंदू नववर्ष अर्थात गुडी पाडव्यानिमित्त १७ मार्च रोजी सायंकाळी रूक्मिणी गार्डन येथे भावसरिता संगीत मैफलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकापेक्षा एक सरस भक्ती, भाव आणि युगल गीतांच्या सादरीकरणाने जालनेकर रसिक मंत्रमुग्ध झाले होते. कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्ज्वलन करून करण्यात आला.दरवर्षीप्रमाणे या वर्षी रूक्मिणी परिवाराच्या वतीने संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले. रसिकांसाठी मराठी संगीतकार केशवराव भोळे यांच्यापासून ते आजचे तरूण संगीतकार अजय-अतुल यांनी संगीतबध्द केलेली एका अनेक गाणी सादर करून श्रोत्यांना कधी जुन्या तर कधी वर्तमानकाळातील गीतांची श्रवणीय भेट दिली.गाणी सादर करतांना त्यामागचा इतिहास आणि ते गाणे त्यावेळी कसे निर्माण झाले याचे आठवणतील किस्से सांगून पुण्यातील प्रभात चित्रनगरीच डोळ्यासमासेर उभी केली होती.प्रसिद्ध कलावंत राजेश दातार, सायली परांजपे-दातार, संदीप उबाळे, प्रज्ञा देशपांडे यांनी ही गाणी सादर केली. यावेळी रसिकांची देखील मोठी दाद मिळाल्याने ही संगीत रजनी उत्तोरोत्तर रंगत गेली. भूपाळी, अभंग आणि विविध चित्रपटांतील जुन्या-नव्या गाण्यांचा संगम अंत्यत चपखलपणे गोवण्यात आल्याने श्रोते एका वेगळ्याच भावविश्वात रमले होते.या मैफलीची निर्मिती व संकल्पना पुणे येथील प्रसिद्ध तबला वादक प्रशांत पांडव यांची असून निवेदन मिलींद कुलकर्णी यांचे तर साथसंगत प्रशांत पांडव, समीर बंकापुरे, दीप्ती कुलकर्णी, विवेक परांजपे यांनी दिली.
पाडव्यानिमित्त संगीत मैफिल रंगली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:46 AM