जालना - मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परंतु, हा व्हिडीओ संपादित केला असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे, अशा प्रकारे संपादित व्हिडीओ व्हायरल करणे चुकीचे असून ही आपल्या राज्याची संस्कृती नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आज मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, त्यावेळी पुन्हा एकदा त्या व्हायरल व्हिडिओचं स्पष्टीकरण देताना माझ्या पोटात एक अन् ओठात एक नसतं, असे म्हटले. तसेच, वडिलांसमवेतचा एक किस्साही त्यांनी सांगितला.
सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी खुर्चीवर बसताना मुख्यमंत्री शिंदे हे काही वाक्य बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरुन विरोधकांनीही राज्य सरकारसह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. या प्रकारावर शिंदे यांनी बुधवारीच नाराजी व्यक्त करत स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर, आज मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर आंदोलनस्थळावरुनही मुख्यमंत्र्यांनी त्या प्रसंगाची माहिती दिली. तसेच, माझ्य ओठात एक अन् पोटात एक नसतं, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितला वडिलांचा किस्सा
हा एकनाथ शिंदेदेखील गरिब शेतकरी कुटुंबाच्या घरात जन्मलेला कार्यकर्ता आहे, आणि आपलाच आहे. त्यामुळे, तुमच्या भावनांची मला मोठी जाणीव आहे. मी तुम्हाला एक आठवण सांगतो, माझे वडिल गावी असतात, मी मागे एकदा साताऱ्याला गेलो होतो, तेव्हा आपलं मागील मराठा आंदोलन सुरू होतं. तेव्हा वडिल सगळी तयारी करत होते, मी म्हणालो काय करताय, कुठे चाललाय. वडिल म्हणाले, मी आपल्या मोर्चात चाललोय, मी म्हटलं कुठला मोर्चा, तेव्हा ते म्हणाले मराठा क्रांती मोर्चा.... असा किस्साही एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितला. माझे बाबा आजही आहेत, ते आंदोलनात येतात, एवढी आपली अटॅचमेंट आहे, समाजाबद्दल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. त्यावेळी, उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या.
व्हायरल व्हिडिओवर पुन्हा एकदा स्पष्टीकरण
मीडियाच्या लोकांनाही माझी विनंती आहे, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. परवा पत्रकार परिषदेचा एक व्हिडिओ चालवला. तुम्ही बरोबर शेंडा आणि बोडका काढला आणि बरोबर मधला दाखवला. पण पूर्णसत्य असं होतं, रात्री आमची दीड वाजेपर्यंत मिटींग झाली. त्या मिटींगमधून आम्ही पत्रकार परिषदेला येत होतो. तेव्हा देवेंद्रजी म्हणाले आजच्या पत्रकार परिषदेत प्रश्न उत्तरे नको, मीही तेच म्हणाले प्रश्नोत्तरे नको आणि राजकीयही काही नको. मिटींगमध्ये आपलं जे ठरलंय तेवढच बोलायचं आणि निघायचं, आता ह्यांनी मागचं काढलं, पाठचं काढलं आणि मधलंच धरलं... असं मुख्यमंत्र्यांनी अॅक्शन करुन दाखवलं, त्यावर उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला.
मी असा माणूस आहे का, एक सर्वसामान्य कार्यकर्ता तेव्हाच मुख्यमंत्री बनतो, जेव्हा तो प्रामाणिक असतो, त्याची नियत साफ असते. माझ्या ओठात एक आणि पोटात एक नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आंदोलनस्थळावरुन व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण दिलं.