घनसावंगी (जि. जालना) : शिवसेना सत्तेत असो किंवा नसो कायम शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहते. आपण शहरी बाबू असलोे तरी शेतकऱ्यांविषयीचा जिव्हाळा कायम आहे. गेल्या ६० वर्षांत गरिबी हटावचा नारा देत काँग्रेसने स्वत:ची घरे भरली. आता पुन्हा तोच मुद्दा घेऊन राहुल गांधी हे मतदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला.
घनसावंगी येथे आयोजित सभेत ते म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टवादी काँग्रेस आहे. त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्याचा निधी हा पश्चिम महाराष्ट्रात वळवून या भागावर कायम अन्याय केला. नागरिकांना कोण प्रामाणिक आहे, हे कळते. त्यामुळे मतदार हे मोदींच्या पाठीशी पुन्हा एकदा भक्कमपणे उभे राहितील यात शंका घेण्याचे कारण नसल्याचे ते म्हणाले. तुम्ही ५६ इंचाच्या छाती असणाऱ्यांना मतदान करणार की, ५६ जणांची सरमिसळ असलेल्यांना निवडून देणार असा सवालही ठाकरे यांनी यावेळी केला. सरकार मजूबत हवे की, मजबूर असा प्रश्न उपस्थित करतानाच शिवसेना कर्जमाफीच्या बाजूने होती. राम मंदिराच्या मुद्यावरही आम्ही आग्रही असल्याचे ते म्हणाले.