लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दहा दिवसांपूर्वी परतूर येथील व्यापारी राजेश नहार यांचा मंठा-जालना मार्गावरील वाटूर फाट्याजवळ गोळ्या घालून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांच्या दृष्टीक्षेपात आरोपी आहेत. परंतु सबळ पुरावा हाती येत नसल्याने आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश येत नाही.नहार यांना यापूर्वीही जालना येथील व्यापारी विजयराज सिंघवी यांच्यावर गोळीबार केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये म्हणजेच बांधकाम व्यावसायिक गौतम मुनोत यांच्या घरावर गेल्यावर्षी जुलैमध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यातही नहार हे संशयित आरोपी होते.दरम्यान, दहा दिवसांपूर्वी पररतूर येथून अर्ध्या तासात जालना येथे जाऊन येतो, असे सांगून घराबाहेर पडलेल्या नहार यांचा मृतदेह त्यांच्या कारमध्ये तीन गोळ्या लागलेल्या अवस्थेत आढळून आला होता. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या सर्व प्रकरणाचे गुढ अद्यापही कायम आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तपास अंतिम टप्प्यात आला आहे. परंतु आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पाहिजे तो सबळ पुरावा अद्याप हाती आलेला नाही. त्यामुळे या गंभीर प्रकरणात नेमके कोण होते, हे अद्याप तरी स्पष्ट झाले नाही. उच्च पातळीवर याचा तपास सुरू असून, प्रचंड गोपनियता बाळगली जात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
नहार खून प्रकरणाचे धागेदोरे सापडेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 1:07 AM