भोकरदन : भोकरदन शहरातील अवैध गर्भपात केंद्र प्रकरणातील प्रमुख असलेला आरोपी नाना सहाणे याने रविवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे शरणागती पत्करली आहे, नाना सहाणेस अटक झाल्यामुळे या प्रकरणातील अनेक नावे उघड होणार असून, इतर आरोपी गळाला लागण्याची शक्यता आहे.
नाना सहाणे याचा अटकपूर्व जामीनअर्ज मुबंई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ९ जानेवारी रोजी फेटाळला होता. त्यामुळे त्याला पोलिसांसमोर शरण आल्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. मात्र, तो स्वतः हून हजर होतो की, पोलिस त्याला पकडतात हा महत्त्वाचा विषय होता, नाना सहाणे याचा अटकपूर्व जामीन नामंजूर करण्यात आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी नाना सहाणे याने रविवारी दुपारी जालना येथील पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. यानंतर स्वतः हून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे हजर झाला आहे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक वाय. डी. उबाळे यांच्यासमोर हजर झाला. पोलिसांनी सायंकाळी ५ वाजता अटक केली असून सोमवारी भोकरदन येथील न्यायालयात आणण्यात येणार असल्याची माहिती सपोनि वाय. डी. उबाळे यांनी दिली.
अनेकांची नावे होणार उघड
मागील वर्षी ७ जुलै रोजी येथील अवैध गर्भपात केंद्रावर पोलिसांनी छापा मारला होता. पोलिसांनी १५ जणांवर गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी १२ जणांना आतपर्यंत अटक करण्यात आली आहे. त्यापैकी १२ जण जामिनावर सुटले आहेत. मात्र, या केंद्राचा मुख्य सूत्रधार डॉ. दिलीपसिंग राजपूत यांचा विश्वासू असलेला नाना सहाणे सहा महिन्यांपासून फरार होता. तो पोलिसांना शरण आल्यामुळे अवैध गर्भपात प्रकरणात असलेले शहरातील डॉक्टर, एजंट व बाहेर जिल्ह्यातील डॉक्टरांची नावे उघड होणार आहे.