राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आदर्श ग्रामसंसद योजनेत जालना तालुक्यातील नंदापूर गाव राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दत्तक घेऊन गत अडीच वर्षांत जलयुक्त शिवार, आमदार निधी आणि जिल्हा परिषदेतील विविध योजनांच्या माध्यमातून मुलभूत सुविधांसह विकास कामे सुरु केली आहेत. २०१९ पर्यंत बहुतांश कामे पूर्ण केली जाणार असल्याचा दावा खोतकर यांनी केला.जालना तालुक्यातील द्राक्ष पंढरी म्हणून उदयास येत असलेल्या कडवंची गावाजवळ नंदापूर हे गाव असून, या गावात पूर्वी मूलभूत सुविधा योग्य त्या प्रमाणात नव्हत्या. महामार्गाशी संलग्न असलेल्या या गावात आता द्राक्षाची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि ग्रामविकास हा केंद्रबिंदू ठेवून राज्यमंत्री खोतकर यांनी नंदापूर या गावाची आदर्श ग्रामसंसद योजनेसाठी निवड केली. गत अडीच वर्षांत जलयुक्त शिवार योजनेतून ३० लाख रुपये खर्चांचे सिमेंट बंधारे आणि २० लाख रुपये खर्चाचे नदी-नाला खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. तसेच दहा लाख रुपये खर्चाचे सामाजिक सभागृह, १० लाख रुपये खर्चाचे दलित वस्ती योजनेतून सिमेंट रस्ते बांधले आहेत.तर ग्रामपंचायत कार्यालयासाठी १२ रुपये खर्चाची इमारत, राष्ट्रीय पेयजल योजनेतून ५० लाख रुपये खर्चाचे काम आणि पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून ५ कोटी रुपये अंदाजपत्रक असलेल्या थार-नंदापूर-अंभोरेवाडी-कडवंची या मार्गाचे काम मंजूर झाले आहे. सदरील कामे आगामी दोन महिन्यांत सुरु होतील, अशी माहिती सरपंच दत्तात्रय भानुदास चव्हाण यांनी सांगितले.विधानसभा मतदार संघातील एक गाव आदर्श संसद योजनेसाठी निवडायचे होते. नजरेसमोर अनेक गावे होती. मात्र, नंदापूर हे गाव सर्वच बाबतीत विकासात तुलनेने मागे होते. या गावातील अनेक शेतकरी प्रगतीशील आहेत. या गावात इतर मूलभूत सुविधांसह आवश्यक ती कामे सुरू झालेली आहे. लवकरच ती पूर्ण होतील. तर विकासाच्या दृष्टीने रस्त्यांची सुविधा आवश्यक होती. यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून पाच कोटी रुपये खर्चाचा रस्ता मंजूर झाला आहे. याचे काम लवकरच सुरु केले जाणार असल्याची माहिती राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.