बदनापूर : विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या दहा वर्षांत केलेली विकास कामे, जनसंपर्क व सक्षम प्रचार यंत्रणा याच्या जोरावर आमदार नारायण कुचे यांनी भरघोस मतांनी विजय प्राप्त करून या मतदारसंघात हॅट्ट्रिक साधली आहे.
बदनापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अनेकांनी यावेळी महायुतीचे नारायण कुचे व महाविकास आघाडीचे बबलू चौधरी यांच्यामध्ये रोमांचक लढत होईल, असे वाटले होते. परंतु पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत आपले मताधिक्य कायम ठेवून महायुतीचे नारायण कुचे यांनी आपला विजय साकार केला. सकाळपासूनच कार्यकर्त्यांच्या मनात धाकधूक असलेल्या बदनापूर मतदारसंघात चुरशीची लढत दिसून आली. २०१४ व २०१९ मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर नारायण कुचे २०१४ च्या निवडणुकीत विजयी होतील का, असा प्रश्न होता. परंतु, या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी विजय खेचून आणला.
नारायण कुचे यांना काही गावांमध्ये विरोधाचा सामना देखील करावा लागला होता. मात्र, विरोधावर मात करत ते विजयी झाले. बदनापूर मतदारसंघात आठ अपक्ष उमेदवारांनी आजमावले होते. परंतु, मतदारांनी त्यांना फारसा काैल दिला नसल्याचे दिसून आले. या मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मतदारांना अधिक प्राधान्य दिल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे.
विजयाची तीन कारणे१ नारायण कुचे यांनी गेल्या दहा वर्षांत जवळपास प्रत्येक गावात विकास कामे केलेली असल्याचे दिसून येते. यामुळेच त्यांना निवडणुकीत पुन्हा विजय मिळाला आहे.२ मतदारसंघातील प्रत्येक गावात कार्यकर्त्यांची फौज निर्माण केली.३ निवडणुकीच्या काळात प्रत्येक गावात सक्षम प्रचार यंत्रणा राबविली.
पराभवाची कारणेनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रचार यंत्रणा कमकुवत राबवली. पक्षफुटीमुळे गावागावात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कमतरता. महाविकास आघाडीतील आघाडीतील घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचीय मोट बांधता आली नाही. शिवाय प्रचारादरम्यान प्रमुख मुद्दे प्रभावीपणे मांडता आलेले नाहीत.