Narendra Modi: युक्रेनमधील तणाव निवळण्यासाठी भारत करणार प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 07:46 AM2022-04-02T07:46:51+5:302022-04-02T07:47:35+5:30
परराष्ट्रमंत्री डाॅ. एस. जयशंकर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
नवी दिल्ली : युक्रेनमधील संघर्ष लवकरात लवकर संपला पाहिजे. तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे परराष्ट्रमंत्री सेर्गेई लावरोव यांना सांगितले. युक्रेनमधील स्थितीची लावरोव यांनी मोदी यांना माहिती दिली. लावरोव हे युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी शुक्रवारी परराष्ट्रमंत्री डाॅ. एस. जयशंकर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
रशिया टाळणार अमेरिकी डॉलर
भारतासारख्या देशांबरोबर त्यांच्या राष्ट्रीय चलनामध्ये व्यापार करण्यासाठी रशियाने एक प्रणाली विकसित केली आहे. डॉलरमधील व्यवहार टाळण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत, असे रशियाचे परराष्ट्रमंत्री सेर्गेई लावरोव यांनी सांगितले. त्यांनी शुक्रवारी परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांची शुक्रवारी भेट घेतली.
नेपाळचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर
नवी दिल्ली : नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा हे तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी शुक्रवारी भारतात दाखल झाले. ते पंतप्रधान मोदी यांच्याशी शनिवारी चर्चा करतील. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हेही शिष्टमंडळाशी चर्चा करतील.