लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे सर्व जनता हैराण असतानाच मंगळवारी जालना शहरात एका लिटर पेट्रोलसाठी चक्क ९० रूपये ४५ पैसे मोजावे लागल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. गेल्या महिन्याभरा पासून ही दरवाढ होत असल्याने यात सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात येत आहे.जालना शहर व परिसरातील पेट्रोल पंपावर मंगळवारी पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केल्याने अनेकांनी राग व्यक्त केला आहे. जालन्यातील हा भाव सर्वात उच्यांकी असल्याचे बोलले जात आहे. या भाव वाढी संदर्भात तक्रार करावी तरी कोणाकडे असा सवाल करण्यात आला. यापूर्वी काँग्रेस तसेच माकपने या भाव वाढविरोधात आंदोलन केले होते.सोमवारी सकाळपासूनच हे नवीन दर लागू करण्यात आल्याचे पेट्रोलपंप असोसिएशनने सांगितले. हे दर मुंबईतून निश्चित होऊन आम्हांला ते कळविले जातात. त्यानुसार आम्ही ग्राहकांना ते आकारत असल्याचे सांगितले. जालना श्हरात एकूण १९ पेट्रोलपंप असून, दररोज हजारो लिटर पेट्रोलची विक्री होत आहे. पेट्रोलची दरवाढ होण्या मागे केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकारच्या वाटा असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना पेट्रोल आणि डिझेलवर जास्तीचा म्हणजेच ९ टक्के अधिभार लावल्याने हे पेट्रोलचे दर वाढले आहेत. एकूणच हे डिझेलचे दर वाढल्याने वस्तूंची ने-आण करण्याच्या किंमती वाढल्या आहेत.
जालन्यात पेट्रोलने गाठली नव्वदी; सर्वसामान्यांत संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 1:04 AM