- योगेश मोरे
शेलगाव (जालना ) : भारताचे राष्ट्रगीत जन-गण-मन हे म्हणता येत नाही. परंतु राष्ट्रगीत सुरू झाल्यावर मोल-मजुरी करणाऱ्या कामगारमहिला डोक्यावर विटा, वाळूचे टोपले असले तरी त्या आहेत, त्या स्थितीत सावधान अवस्थेत उभे राहून झेंड्याला सलाम करतात.
बदनापूर तालुक्यात सध्या गेल्या काही महिन्यांपासून शेलगाव शाळेचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर जवळपास २० ते २५ महिलाकामगार कार्यरत आहेत. आज बहुतांश सुशिक्षित लोकही जर शाळे समोरून राष्ट्रगीत सुरू असताना जात असतील ते थांबण्याची तसदी घेत नसल्याचे अनेकवेळा दिसून आले. परंतु राष्ट्रगीताचा सन्मान काय असतो हे त्यांना कधीतरी गावातील शाळेत पहिली-दुसरीपर्यंत शिक्षण घेतांना माहिती झालेला असतो. तोच अनुभव या कामगार महिला आजही तेवढ्याच तन्मयतेने जपत असल्याने सर्वांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
या महिला कामगारांच्या या अनोख्या शिस्तीवर लक्ष गेले ते, शेलगाव येथील जि.प. शाळेत कार्यरत असलेले शिक्षक जगत घुगे यांचे त्यांनी त्याची दखल घेत ही माहिती मुख्याध्यापकांना दिली. त्यांनी त्याची दखल घेऊन या कामगारांपैकी संगीता साळवे आणि सविता साळवे यांचा प्रातिनिधिक स्वरूपात नुकताच सत्कार केला. या शाळेकडून झालेल्या सत्काराने त्या महिला भारावल्या होत्या.
मी निरक्षर आहे, वडिलांच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे मला शाळेत जाता आले नाही, शिकून देशसेवा करायची माझी इच्छा होती. मला एकच मुलगा आहे. तो सातवीत शिकतो, तरी मुलाने शिकून राष्ट्रसेवा करावी अशी माझी इच्छा आहे. -संगीता मोकिंद साळवे
मी कधीच शाळेत गेले नाही. पण आता कोठेही कामाला गेले आणि माझ्या कानावर राष्ट्रगीत कानी पडले, तर आम्ही आहे तेथेच थांबतो, एकप्रकारे राष्ट्रसेवेचा आनंद मला त्या ठिकाणी मिळतो. - सविता पुंजाराम खंडाळे