लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतीला पुरक उद्योग म्हणून दुग्ध व्यवसाय आणि अन्य पशु पालन व्यवसायातून मोठा हातभार लागू शकतो या उद्देशाने जालन्यात लवकरच राष्ट्रीय पातळीवरील पशु, पक्षी प्रदर्शन भरविण्या संदर्भात मुंबईत मंगळवारी आढावा बैठक झाल्याची माहिती पशु संवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली.या बैठकीस दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.राज्यमंत्री खोतकर यांच्या संकल्पनेतून आयोजित या प्रदर्शनाला यशस्वी करण्यासाठी जानकर यांनी संबंधित खात्याच्या विभाग प्रमुखांशी सविस्तर चर्चा करून हे प्रदर्शन यशस्वी करण्याचे निर्देष दिले. सुमारे १०० एकर परिसरात देशातील वेगवेगळे पशुधन आणि त्याचे महत्त्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना व्हावे या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये उत्तम जातीचे घोडे, बैल, गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांसह कुकूट पालन, रेशीम कोष पालन आदींचा समावेश राहणार आहे. प्रदर्शन राष्ट्रीय पातळीवरील असल्याने संपूर्ण देशभरातील वेगवेगळ्या प्रदेशाच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करण्यात येऊन प्रदर्शनात सहभागी होण्यासाठीचे आवाहन करण्यात येणार असल्याचे खोतकर यांनी सांगितले.या बैठकीस दुग्ध विकास आयुक्त राजीव जाधव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी आणि शास्त्रज्ञ उपस्थित होते.
जालन्यात राष्ट्रीय पातळीवरील पशु, पक्षी संवर्धन प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:51 AM