- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : दिंडोरी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी शुक्रवार सकाळी अंतरवाली सराटीत येऊन मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. त्यानंतर खासदार भगरे यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला. मराठा समाजामध्ये अनेक गरीब कुटुंब आहेत, त्यांचा विकास झालेला नाही. यामुळे मराठा आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार पक्षाची आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेस पक्ष आणि मी सहमत आहे असे भास्कर भगरे म्हणाले.
खासदार भगरे पुढे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जे आंदोलन सुरू आहे त्यास पाठिंबा देण्यासाठी आलो. शरद पवारांची भूमिका मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशीच आहे. लोक काय अर्थ काढता यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण मिळाव ही पक्षाची भूमिका आहे. तीच भूमिका माझी राहणार आहे असे खासदार भगरे म्हणाले.
भुजबळांचे कट्टर विरोधक म्हणून भास्कर भगरे यांची ओळख आहे. उद्या 20 जुलै पासून मनोज जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्या अनुषंगाने आज खासदार भगरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार भगरे यांनी मनोज जरांगे यांची अचानक घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.