लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जीवन जगताना अनेक गोष्टी मिळविण्यासाठी प्रत्येकाला लढाई करावी लागते. परंतु, ही लढाई करीत असताना माणुसकी ही जपलीच गेली पाहिजे. महाराजा अग्रसेन यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान अचरणात आणावेत. जगा आणि जगू द्या, हे त्यांचे ब्रीद प्रत्येक अग्रवाल कुटुंबाने प्राणपणाने जपले पाहिजे, असे मार्गदर्शन राष्ट्रसंत सुधांशू महाराज यांनी केले.जालना येथे आयोजित अग्रवाल संमेलनाचा रविवारी थाटात समारोप झाला. समारोपप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या ओघावत्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी अनेक पौराणिक उदाहरणे देऊन विश्लेषण केले. आयुष्यात कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी त्याग, समर्पण आणि परिश्रम हे करावेच लागतात. या तिन्हींचा संगम झाल्यानंतर जे यश मिळते, ते चिरकाळ टिकणारे असते. अग्रवाल समाजाने नेहमीच देण्याचे काम केले आहे. परोपकार हा या समाजाचा विशेष गुण आहे. महाराजा अग्रसेन यांनी समाजाचा भक्कम पाया रचून एक मानवी तत्त्वज्ञान दिले आहे. पोट आणि पेटी भरणे याला जीवन म्हणत नाहीत. जगताना असे जगा की ज्यातून स्वत: आनंद उपभोगताना तो दुसऱ्यालाही मिळाला पाहिजे, याचा विचार करा. चांगले कर्म आणि किर्ती ही तुम्हाला तुमच्या मृत्यूपश्चातही जीवंत ठेवणार आहे.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या अग्रवाल समाजातील मान्यवरांचा राष्ट्रसंत सुधांशुजी महाराज, शांतीलाल मुथा व इतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यामध्ये रमाकांत खेतान (जीवन गौरव), अग्रश्री पुरस्कार डॉ. सुशील भारुका (जालना), रतनलाल गोयल (पुणे), कमलकिशोर झुनझुनवाला (जालना), पवनकुमार मित्तल (जळगाव), सागर रामेश्वर मोदी (खामगाव), श्रीनिवास अग्रवाल (इचलकरंजी), दीपक अग्रवाल (अमरावती), डॉ. जगदीश गिंदोडीया (धुळे) यांना सन्मानित करण्यात आले.अधिवेशनात घेण्यात आले चार ठरावया अधिवेशनात एकूण चार ठराव घेण्यात आले. यामध्ये अग्रवाल तरूणांसाठी, बेरोजगारांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना प्लेसमेंट देणे, समाजातील तरुणांना अध्यात्माशी जोडून संस्कारक्षम करणे ही काळाची गरज बनली आहे. कोणत्याही शहरात वृद्धाश्रम उघडले जाऊ नयेत, आई-वडील आणि आजी-आजोबा हा त्यांच्या कुटुंबातील महत्त्वाचा भाग आहे.हा संस्कार तरुण पिढीला देण्यात यावा, या अधिवेशनाचा तिसरा उद्देश म्हणजे मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना दत्तक घेऊन काही शेतकरी कुटुंबांच्या मुलांना सर्वतोपरी सहकार्य करणार, पर्यावरणाकडे लक्ष देऊन प्रदूषण रोखण्यावर भर देणार, प्रत्येक अग्रवाल कुटुंबाने किमान एक रोप लावावा आणि प्रयत्न करावेत. अशाप्रकारे राष्ट्रीय स्तरावरील ठराव घेण्यात आले.
जीवनाच्या लढाईत माणुसकीचा धर्म जपण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 12:55 AM