टेंभुर्णी (जालना) : एरवी शिक्षक दिनाला अनेक ठिकाणी शिक्षकांना प्रशासनाकडून आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यासाठी शिक्षकांना स्वतः आपल्या कार्याची फाईल दाखल करावी लागते. मात्र, जाफराबाद तालुक्यात एक अशी शाळा आहे, तेथे शाळेतील शिक्षकांना प्रशासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराची वाट पाहावी लागत नाही. त्या शाळेत दरवर्षी शिक्षक दिनी शाळेतील विद्यार्थीच आपले आदर्श शिक्षक निवडतात. तेही गुप्त मतदानाने.
आदर्श शिक्षक पुरस्कार मिळण्यासाठी अनेक गुरुजी आटापीटा करत असतात. एकदा पुरस्कार मिळाला की, आपण आदर्श झालो, असा त्यांचा समज असताे. आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यासाठी बरीच मोठी वेटिंग असते. आता हे पुरस्कार कोणाला द्यायचे, हे वरिष्ठ अधिकारी ठरवतात. मात्र, विद्यार्थ्यांच्या मनात असणारा चांगला शिक्षक म्हणजे आदर्श शिक्षक ठरू शकतो. यामुळेच येथील ईबीके उर्दू विद्यालयात विद्यार्थीच आदर्श शिक्षकाची निवड करतात.
टेंभुर्णी येथील ईबीके उर्दू विद्यालयात दरवर्षी हा आगळावेगळा आदर्श पुरस्कार शिक्षकांना दिला जातो. यावर्षी प्राथमिक विभागातून शेख गयास यांची, तर माध्यमिक विभागातून शेख साबेर यांची विद्यार्थ्यांनी या पुरस्कारासाठी निवड केली. यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः आणलेल्या ट्रॉफी देऊन या दोन्ही शिक्षकांचा शाळेत गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांकडून मिळालेला पुरस्कार हा आमच्यासाठी सर्वोच्च गौरव असल्याचे मत आदर्श शिक्षक शेख साबेर यांनी व्यक्त केले.
विद्यार्थी करतात मतदानशाळेतील आदर्श शिक्षक निवडण्यासाठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे मतदान घेण्यात येते. हे मतदान गुप्त पद्धतीने घेण्यात येते. यामुळे कोणत्या विद्यार्थ्याने कोणत्या शिक्षकांची निवड केली हे समजत नाही. शिक्षक दिनाच्या एक दिवस अगोदर शाळेतील सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात ठेवलेल्या बॉक्समध्ये आपल्या बेस्ट टीचरच्या नावाची चिठी टाकतात. त्यानंतर सर्वाधिक पसंती आलेल्या शिक्षकाची आदर्श शिक्षक म्हणून निवड केली जाते. शिक्षक दिनापर्यंत हे नाव विद्यार्थ्यांकडून गोपनीय ठेवले जाते.
शिक्षकांना या पुरस्काराचे गिफ्ट शिक्षक दिनी विद्यार्थी शाळेचे सर्व कामकाज चालवतात. यावेळी एका कार्यक्रमाचे आयोजन करून शिक्षकांना या पुरस्काराचे गिफ्ट दिले जाते. यामध्ये शिक्षकांचा कुठलाही सहभाग राहत नसतो.- शेख सुमैय्या रोशन, मुख्याध्यापिका.