जालना : जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून बोंडअळीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जवळपास ४० टक्के क्षेत्र या अळीने व्यापले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
यावर उपाय करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीचे उपाय सुचिवले आहेत. त्यात प्रामुख्याने कामगंध सापळे लावणे, फरदड कापूस न वेचणे, तसेच डिसेंबरपूर्वी सर्व कापसाची वेचणी करणे गरजेचे असल्याचे कपाशी विषयाच्या तज्ज्ञांनी नमूद केेले आहे. जिल्ह्यात यंदा जवळपास तीन लाख १० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड केली आहे. आता कापूस वेचणी होऊन अनेक शेतकऱ्यांचा कापूस बाजारात दाखल झाला आहे. अनेक शेतकरी आता मिळेल त्या दराने कापासाची विक्री करताना दिसून येत आहेत. अद्याप बहुतांश शेतकऱ्यांची कापूस वेचणी शिल्लक आहे. त्यामुळे ती त्यांनी तातडीने करून बोंड अळीपासून बचाव करणे शक्य होणार आहे.
जिल्ह्यात यापूर्वी २०१६ मध्ये बोंडअळीने मोठ्या प्रमाणावर हल्ला चढवून ८० टक्के कपाशीचे नुकसान झाले होते. याहीवेळी तशीच अवस्था असून, आजघडीला ४० टक्के क्षेत्र प्रभावित झाले आहे, यात गुणोत्तर पद्धतीने वाढ होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या हंगामाचा विचार न करता, पुढील वर्षाचा विचार करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकरी थेट फेब्रुवारीपर्यंत कापसाची वेचणी करून तो विक्री करतात; परंतु हे आता धोकादायक ठरू शकते. आजही शेतकऱ्यांनी जो कापूस बाजारात आणला आहे, त्यातही काही प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही गंभीर बाब असून, या बाेंडअळीची जनन साखळी तोडण्यासाठी खबरदारी हाच एक ठोस पर्याय असल्याचे सांगण्यात आले. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कापूस उत्पादकांनी उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.
कामगंध सापळे ठरतील संजीवनी जिल्ह्यात चार वर्षांपूर्वी ज्यावेळी बोंडअळीने थैमान घातले होते. त्यावेळी सर्वात मोठी भूमिका ही कामगंध सापळ्यांनी निभावली होती. आता ही वेळ निघून गेली असली तरी, शेतकऱ्यांनी आहे त्या कपाशीची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी, तसेच शेतात असलेल्या पऱ्हाटीच्या झाडांचा भुसा करून त्यापासून खताचे उत्पादन घेता येईल. यासाठी कृषी विज्ञान केंद्राने जालना तालुक्यातील वखारी आणि बदनापूर तालुक्यातील वानडगाव येथे लावलेले कामगंध सापळे यशस्वी झाले आहेत. आतापर्यंत जवळपास दोन लाख कामगंध सापळे लावण्यात आले होते. -अजय मिटकरी, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र