मिरवणूक कार्यक्रम
पिंपळगाव रेणुकाई : अयोध्या येथे बांधण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराच्या निधी संकलनासाठी पिंपळगाव रेणुकाई (ता.भोकरदन) येथे शुक्रवारी निधी संकलन अभियान राबविण्यात आले. गावातील रेणुकाई मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली होती.
मिरची लागवडीतून आर्थिक किमया
माहोरा : जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील राम लहाने यांनी २० गुंठे जमिनीवर लागवड केलेल्या मिरचीतून अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. पारंपरिक पिकातून चांगले उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे काळानुरूप शेतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे. नव-नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून या मिरची पिकाची लागवड केली असल्याचे लहाने यांनी सांगितले.
पिकांचे नुकसान
मान देऊळगाव : बदनापूर तालुक्यातील मान देऊळगावसह आसोला, पठार देऊळगाव व तुपेवाडी परिसरात मागील काही दिवसांपासून रानडुकरांचा वावर वाढला आहे. डुकरे हाती आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान करीत असल्याने उत्पादकांमधून चिंता व्यक्त होत आहे.
पाणीटंचाई कायम
मान देऊळगाव : मान देऊळगाव येथे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत घाणेवाडी येथून पाणी आणण्यात आले आहे, परंतु विहिरीजवळ विजेची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून गावात पाणी येत नसल्याने ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
अंबड शहरात पथकाची स्थापना
अंबड : शहरातील अकृषिक कर वसुलीसाठी महसूल विभागाच्या वतीने १५ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. विविध वसाहत व कॉलनीनिहाय अकृषिक कराची वसुली करण्यात येणार आहे. पाच मंडळाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ही पथके स्थापन करण्यात आली आहेत. यात मंडळाधिकारी शिवाजी गाडेकर, बी.बी. भार्डीकर आदींचा समावेश आहे.
मराठी भाषा पंधरवाडा कार्यक्रम
जाफराबाद : येथील दिवाणी न्यायालयाच्या वतीने मराठी भाषा पंधरवाडा कार्यक्रम गुरुवारी घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.र.तु. देशमुख, वकील संघाचे अध्यक्ष ॲड.विनोद डिगे, सचिव ॲड.सादिक शेख यांची उपस्थिती होती. यावेळी देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मंठा शहरातील मुख्य रस्त्यावर सांडपाणी
मंठा : शहरातील मुख्य रस्त्यावर मागील अनेक दिवसांपासून सांडपाणी येत आहे. याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. विशेषत: सांडपाणी येत असलेल्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडली असून, त्यात सांडपाणी साचत आहे. वेळीच याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.