जालना : २० हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांसाठी शेजारी राहणाऱ्या महिलेचा खून करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली. रेखाबाई बाबुराव कोलपे (५०, रा. पानशेंद्रा, ता. जालना) व भगवान विजयकुमार पाटील (३१, रा. मोदीखाना, जालना) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
पानशेंद्रा येथील सुमनबाई माणिक जिगे (६५) यांचा ११ मार्च रोजी बदनापूर तालुक्यातील साखरवाडी परिसरात मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, ८ मार्च रोजी सुमनबाई जिगे या गावातीलच रेखाबाई कोलपे यांच्यासोबत गेल्या होत्या. यावरून पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी आणखी सखोल चौकशी केली असता, मयत महिलेने हात उसने घेतलेले पैसे परत केले नसल्याने तिच्याबाबत मनात राग होता. शिवाय, तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरीने चोरून घेण्यासाठी हा खुनाचा प्लॅन आखल्याची कबुली दिली. ८ मार्च रोजी आरोपी महिलेने माझ्या घरावर कर्ज घ्यायचे आहे. तुम्ही जामीनदार व्हा, असे सांगून मयत महिलेला सोबत घेऊन जालना येथे आली. जालना येथून साथीदाराच्या दुचाकीवरून तिघेही जण राजूर येथे गेले. दर्शन घेतल्यानंतर ते दाभाडी मार्गे साखरवाडी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात जेवायला बसले. तेथेच महिलाचा दोरीने गळा आवळून व चाकूने वार करून खून केला.
पोलिसांनी आरोपी महिलेचा साथीदार भगवान विजयकुमार पाटील यालाही ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, सागर बावीस्कर, दत्ता वाघुंडे, कैलास चेके, योगेेश सहाने, मंदा नाटकर, चंद्रकला शडमल्लू, रमेश पैठणे यांनी केली आहे.