लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर येथे हसनाबाद पोलीस व अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल ९ लाखांचा गुटखा, सुगंधी तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला.राजूर येथे बंदी असलेला गुटखा सर्रास विक्री होत असल्याची माहिती सपोनि एम.एन.शेळके यांना मिळाली होती.या माहितीवरून पोलिसांनी मंगळवारी दुपारी राजूर शिवारातील टेंभुर्णी रस्त्यावरील संदीप भूमकर, दीपक भूमकर, दत्ता भूमकर यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये धाड मारली. यात राज्यात बंदी असलेला असलेला विविध कंपन्यांचा गुटखा, सुगंधी तंबाखू असा एकूण ९ लाख ३० हजार ११६ रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी संजय चाटे यांनी पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेतला. संजय चाटे यांच्या तक्रारीवरून हसनाबाद पोलीस ठाण्यात संदीप भुमकर, दीपक भुमकर, दत्ता भुमकर यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई सपोनि एम.एन. शेळके, प्रताप चव्हाण, प्रशांत उबाळे, गणेश मांटे, संतोष वाढेकर, पवन सुंदरडे, संतोष नागरे, मनिषा शिंदे, अन्न व औषध प्रशासनचे संजय चाटे, निखील कुलकर्णी यांनी केली.
नऊ लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 12:44 AM