धावडा : भोकरदन तालुक्यातील धावडा येथील बसस्थानक परिसरातील कॉम्प्लेक्समधील नऊ दुकानांना मंगळवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात जवळपास ७७ लाख ३० हजारांचा माल जळून खाक झाला आहे.
धावडा येथील बसस्थानकाजवळ एक कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्समध्ये दोन मोबाईल शॉपी, चार हॉटेल, दोन पाच सेंटर आणि एक कृषी सेवा केंद्र आहेत. हे सर्वजण मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकानांचे शटर बंद करून घरी गेले होते. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या गाडीचे सायरन वाजल्याने बुलडाणा अर्बन बॅंकेच्या सुरक्षारक्षकाला जाग झाली. त्याचवेळी सुरक्षारक्षकाला दुकानांना आग लागल्याचे दिसले. त्याने याची माहिती दुकान मालकांना दिली. नंतर आग आटोक्यात आण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु, आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आली नाही.
ग्रामस्थांनी आमदार संतोष दानवे, तहसीलदार सारिका कदम यांना फोन करून माहिती दिली. भोकरदन नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. यावेळी तलाठी संदीप लाड, पोलिस ही घटनास्थळी होते. या आगीत विनायक तांगडे यांचा ३५ लाख, सुकलाल वैरी २२ लाख, सोमनाथ घोडकी चार लाख, कृष्णा गवळी दोन लाख, राजू अप्पा घोडकी एक लाख ८० हजार, प्रकाश ठाकरे यांचे तीन लाख, लक्ष्मण लांडगे चार लाख, विठ्ठल तांगडे साडेचार लाख, तर लालू राम जोशी यांचा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला. मंडळ अधिकारी कृष्णा एडके व तलाठी संदीप लाड यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
नुकसानभरपाई देण्याची मागणीया आगीची माहिती महावितरण कंपनीलाही देण्यात आली आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ भरपाई देण्याची मागणी सरपंच विलास बोराडे, माजी सरपंच बेलाप्पा पिसोळे, माणिक सुरसे, हरी शंकर मेहता, ज्ञानेश्वर आहेर, एकनाथ लुटे, शिवाजी लुटे, प्रकाश वैरी, रमेश तांगडे, आदींनी केली आहे.