जालना, दि. 29 - ठेकेदारानं रस्तेबांधणीचं काम नीट केलं नाही, तर त्याला बुलडोजरखाली घातल्याशिवाय राहणार नाही, अशा कडक शब्दांत केंद्रीय परिवहनमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी इशारा दिला आहे. यासोबतच देशात आजवर मी सहा लाख कोटीची काम केली, पण आजवर लक्ष्मीदर्शन घेतलं नाही, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना टोला लगावला.
नितीन गडकरी यांच्या हस्ते आज जालन्यातील वाटूर येथे शेगाव-पंढरपूर, दिंडी आणि वाटूर फाटा ते परभणी या रस्त्याच्या चौपदरीकरणाचं उद्घाटन झालं. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरदेखील उपस्थित होते.
' देशभरात आजवर मी इतकी काम केली असताना ठेकेदार कोण असतो? हे मला माहित नसतं. आजवर एकाही ठेकेदाराच्या पैशाचा मी मिंदा नाही', असं नितीन गडकरी बोलले आहेत. सोबतच शेगाव-पंढरपूर रस्त्याचं काम चांगलं झालं पाहिजे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. 'रस्त्याचं काम चांगलं होत नसेल, तर फक्त मला कळवा. या ठेकेदाराला मी बुलडोजरखाली घातल्याशिवाय राहणार नाही', असा इशाराच गडकरींनी यावेळी दिला आहे.
मी महाराष्ट्राचा असल्याने माझ्या महाराष्ट्राला केंद्रातून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यात यशस्वी ठरलो.येत्या पाच वर्षात 3 लाख कोटींची कामे महाराष्ट्रात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत 65 हजार कोटी रुपयांचा विविध कामासाठी निधी मराठवाड्याला दिला आहे. आणखी 10 हजार कोटी रुपये देणार आहे.मराठवाडयाच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही. ही कामे डिसेंबर पूर्व सुरु होईल असे गडकरी यांनी सांगितले.
खासदार आमदारांनी राजकारण बाजूला ठेऊन भूसंपादन करावे....चार पदरी रस्ता करण्याचे आदेश देतो मात्र भूसंपादन करण्यासाठी तुम्ही खासदार आमदारांनी राजकारण बाजूला ठेऊन मदत करावी मी रस्त्यासाठी निधी कमी पडु देणार नाही.काम पूर्ण झाल्यानंतर दानवे तुमच्या हातात कात्री राहील व सत्तारांच्या हातात रिबिन देईल असे गडकरी यांनी सांगितले.
एक वर्षात काम पूर्ण करणार.........पाऊस उघडला तर तीन दिवसात काम सुरु होईल.नाही तर एक महिन्याच्या आत सर्व रस्त्यांची काम सुरु होईल.या रस्त्याच्या काम करण्याचा कालावधी दोन वर्षाचा आहे. मात्र एक वर्षाच्या आत ही सर्व कामे झाली पाहिजे असे आदेश गडकरी यांनी यावेळी ठेकेदार व संबधित अधिका-यांना दिले.
मी लक्ष्मी दर्शन घेतले नाही.........मैं जो बोलता हूँ ....वो करके दिखाता हूँ ...मराठवाड्यासाठी 64 हजार 730.32 कोटी रुपयांची कामे मंजूर केली. त्यात मी लक्ष्मी दर्शन घेतले नाही. या निधीतून होणारे रस्ते हे 200 वर्ष टिकेल यात एकही खड्डा पडणार नाही जर या कामात ठेकेदारांनी गडबड केली. तर बुलडोजर खाली आडवा करेल असा दम देत ....मैं जो बोलता हूँ ....वो करके दिखाता हूँ ...जर सांगितलेले काम नाही केले तर प्रसार माध्यमांनी याला ब्रेकींग न्यूज करावे. विकासकामात मी राजकारण करणार नाही असं नितीन गडकरी बोलले आहेत