जालना/भोकरदन : जालना, भोकरदन तालुक्यासह जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये एकाही इच्छुक उमेदवाराने पहिल्या दिवशी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. प्रशासनाने उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. मात्र, अनेक गावांतील पॅनलप्रमुखांकडून अद्यापही उमेदवार अंतिम न झाल्याने पहिल्या दिवशी एकाचाही अर्ज दाखल झाला नसल्याचे चित्र आहे.
जालना तालुक्यात ८६ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यात ७४० सदस्य विजयी होणार असून, त्यासाठी एक लाख ३० हजार ६२० मतदार मतदान करणार आहेत. बुधवारपासून नामनिर्देशन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तहसील कार्यालयात अर्ज स्वीकारण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. उमेदवार विचारत असलेल्या शंकांचे निरसनही अधिकारी, कर्मचारी करीत आहेत.
भोकरदन तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यामुळे पॅनल तयार करण्यासाठी कार्यकर्ते गावात गुंतले आहेत. त्यामुळे शहरातील नेहमी येणाऱ्यांची गर्दी कमी झाली आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी प्रशासनाने नगर परिषदेच्या मंगल कार्यालयात २८ टेबल ठेवले आहेत. उमेदवाराने अर्ज ऑनलाइन केल्यानंतर ऑफलाइन अर्ज या निवडणूक अधिकाऱ्यांकडे द्यावा लागणार आहे. मात्र, बुधवारी एकही अर्ज आला नसल्याचे तहसीलदार संतोष गोरड, नायब तहसीलदार धर्माधिकारी यांनी सांगितले. शहरातील सर्वच ऑनलाइन सेंटरच्या ठिकाणी अर्ज ऑनलाइन करण्यासाठी गर्दी झाली होती. तसेच जात प्रमाणपत्र, मिळविणेसुद्धा अवघड झाले आहे. त्याचप्रमाणे बँकेचे नवीन खाते उघडण्यासाठीही दमछाक होत आहे.