- विजय मुंडेजालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मनाेज जरांगे यांचे उपोषण नवव्या दिवशीही सुरू आहे. जरांगे हे भावनिक होतील म्हणून कुटुंबातील सदस्यांनी उपोषणस्थळी जाणे टाळले असून, नऊ दिवसांत त्यांचे फोनवरही बोलणे झाले नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी शहागड येथे मोर्चा काढल्यानंतर अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आरक्षणाचा जीआर निघेपर्यंत माघार नाही, यावर ते ठाम आहेत.
उपोषणस्थळी गेलो; परंतु, त्याच्याशी जास्त बोलणं झालं नाही. तो उपोषणास बसणार हे माहिती नव्हतं. त्याच्या आईला चालता येत नाही. ती गावाकडे आहे. पोराची अवस्था पाहून तेथून यावे वाटत नव्हते; पण जनतेसाठी लढतोय. - रावसाहेब जरांगे, मनोज जरांगे यांचे वडील
मोर्चा निघाला त्या दिवशी मी त्यांना घरीच बोलले होते. मी उपोषणस्थळी गेले नाही. त्यांच्याशी फोनवरही बोलणं झालं नाही. शासनाला एकच विनंती आहे, मागण्या मान्य कराव्यात, आरक्षण लवकर द्यावे.- सुमित्रा जरांगे, मनोज जरांगे यांच्या पत्नी