- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : सरकारने ३० सप्टेंबरच्या आत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, कर्जमुक्ती कशी होत नाही, हेच पाहतो, असा नवा अल्टीमेटम मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला. सरकारने ३० सप्टेंबरच्या आत कायमची कर्जमुक्ती करायची, सगळा पिकविमा, अनुदान द्यायचे. आता शेतकऱ्याच्या पिकाला भाव कसा मिळत नाही हे आम्ही बघतो, असे इशारा देखील जरांगे यांनी दिला.
आगामी विधानसभा निवडणूक लढण्याच्याबाबत मनोज जरांगे चाचपणी करत आहेत. त्यांच्या आवाहनानंतर इच्छुकांनी विधानसभेच्या संपूर्ण माहितीसह गर्दी केली आहे. आतापर्यंत सातशे ते आठशे अर्ज आली असतील. छाननी सुरू आहे, आणखी काही इच्छुक भेट आहेत, अशी माहिती जरांगे यांनी दिली. विरोधात बोलणारेही तुमच्या भेटीला येत आहेत, या प्रश्नावर जरांगे म्हणाले की, ही गोरगरीब समाजाची लढाई आहे. जातीधर्माच्या विरोधात काम केल, त्याचा त्यांना पश्चाताप झाला हेच महत्त्वाचं. मराठ्यांच्या मता शिवाय कोणताच पक्ष निवडून येत नाही हे त्यांना माहिती आहे, असे जरांगे म्हणाले.
शेतकऱ्याला कर्जमाफी नको कर्जमुक्त करादरम्यान, जरांगे यांनी आता शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा प्रश्न हाती घेतला आहे. ते म्हणाले, शेतकरी म्हणजे आपणच, त्याला किती दिवस फसवायचं, कर्जमाफी नको कर्जमुक्ती करा कायमची. तुम्ही कर्जमुक्ती केल्यानंतर कर्जही देऊ नका. शेतकऱ्यांना ज्या सुविधा लागतात त्या द्या. त्यांना कायमची वीज द्या, पाण्याची सुविधा करा, अशी मागणी जरांगे यांनी केली. तसेच शेतमालाला भाव दिला तर शेतकरी आत्महत्या होऊच शकत नाहीत, असा दावाही जरांगे यांनी केला.
पीक विमा कंपन्या देशाबाहेच्या आहेत का?पिकं विमा भरल्यावर तो मिळत नाही. सरकारचा या कंपन्यांवर धाक कसा नाही. त्यांच्याकडून टॅक्स घेत नाहीत का ? विना परवाने चालतात का कंपन्या? असा सवाल जरांगे यांनी करत सर्व शेतकऱ्यांना पिक विमा मिळाले पाहिजे, अशी मागणी केली. पिक विमा कंपन्यांचे संरक्षण करून शेतकऱ्याला मारता का? असा जाब विचारात जरांगे यांनी या कंपन्याकडे सुद्धा आम्ही लक्ष देणार आहोत असा इशारा दिला. पैसे घेताना गोड वाटते अन् विमा देताना हे कागद आणा ते आणा असे करता. दुसरीकडे सरकार म्हणते कंपन्या बाहेरच्या आहेत. त्या कंपन्या काय देशा बाहेरच्या आहेत का ? तुम्हाला तिकडे जाता येत नाही. किती फसवणार शेतकऱ्यांना, असे म्हणत जरांगे यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला.