वडीगोद्री : कोणालाही घाबरण्याची गरज नाही. ज्यांनी मराठा आरक्षणासाठी त्रास दिला त्यांना सोडू नका, मी आता कारभार मराठ्यांच्या हातात दिलाय, आपले मत वाया जाऊ नये, असे मनोज जरांगे-पाटील म्हणाले. रविवारी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
राजकारणापेक्षा आपण सर्वजण मिळून आपल्या आंदोलनाची तयारी करू या. आपल्याला कोणाशी काही देणेघेणे नाही. आजपासून पुढील आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. पुढच्या वेळी सामूहिक उपोषण करणार असे म्हणत पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी उपोषण करण्याची भूमिका जाहीर केली आहे. मराठा समाजात संभ्रम नाही. संभ्रम शब्द सारखा वापरला जात आहे, संभ्रम असण्याचे काही कारण नाही. स्वत निवडून येण्यासाठी काही जण संभ्रम पसरवत आहेत. ज्याला पाडायचे त्याला पाडा ज्याला निवडून आणायचे त्याला आणा, मतदान तुमच्या हातात आहे. तुमच्या हिताचा निर्णय तुम्ही घ्या ज्याने आपल्या जातीवर अन्याय केला, त्याला पाडा. मराठा समाजाने गावागावात आपल्या आंदोलनाशी सहमत असणाऱ्या उमेदवारांचे व्हिडीओ घ्या. तो व्हिडीओ अगोदरच जाहीर करू नका, असे आवाहन मराठा बांधवांना केले. मी कोणाला पाडण्यासाठी पक्षाचे नाव सांगितले नाही, राज्यभरात कोणालाच पाठिंबा दिला नाही, मी. त्यातून अलिप्त झालो आहे. मविआ, महायुती, अपक्ष यांना कोणालाही मी पाठिंबा दिलेला नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.