लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील रेल्वेस्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुजोर वाहनधारक सर्रास अवैधरीत्या वाहनांची पार्किंग करित आहेत. यामुळे आता चक्क नो- पार्किंग फलकच वाहनांच्या विळख्यात सापडला आहे.याचा प्रवाशांना रेल्वेस्थानकाबाहेर ये- जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने त्यांच्यातून संताप व्यक्त केला जात आहे.येथील रेल्वेस्थानकातून दिवसभरात जवळपास ४० ते ४५ रेल्वे धावतात. यामुळे सतत येथे प्रवाशांची गर्दी असते. तसेच रेल्वेस्थानकाबाहेर ठिकठिकाणी नो- पार्किंग अशा नावाचे फलक लावलेले आहे. मात्र, काही दुचाकीधारक व रिक्षा चालक सर्रास या फळकासमोरच वाहने पार्किंग करतात. यामुळे रेल्वेस्थानकात प्रवेश करताना व बाहेर जातांना प्रवाशांना नागमोडी रस्ता काढावा लागत आहे. साधे जालना रेल्वेस्थानक नाव घेतले तरी शहरवासियांसह, प्रवाशांच्या डोळ््यासमोर आता पार्किंग समस्येचे अस्ताव्यस्त चित्र डोळ््यांसमोर उभे राहिल्याशिवाय राहत नाही.स्टील आणि बियाणांची राजधानी म्हणून जालन्याची ओळख राज्यात निर्माण झालेली आहे. यामुळे येथे दिवसेंदिवस प्रवाशांचा ओघ वाढतच आहे. मात्र, अनधिकृत पार्किंगची अवस्था काही केल्या सुधारत नसल्याचे दिसून येत आहे.तसेच नातेवाईकांना सोडण्या- आणण्यासाठी येथे येणारे सुज्ञान नागरिक रेल्वेस्थानकाच्या पार्किंगमध्ये गाडी पार्कींग न करता रस्त्यावरच दुचाकी उभा करतात. किमान यापुढे तरी ही पार्किंग व्यवस्था सुधरावी अशी मागणी होत आहे.रेल्वेस्थानका समोरील रस्त्यावर कार, दुचाकी व रिक्षा उभ्या राहत असल्याने रेल्वेस्थानकात प्रवेश करणे अवघड झाले आहे. आणीबाणीच्या काळात जर अग्निशमन बंब, रूग्णवाहिका रेल्वेस्थानकात आणण्याचे म्हटल्यास अवघड असल्याचे दिसत आहे.रेल्वे प्रशासनाने अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांना दंड करण्यास सुरुवात करावी, अशी मागणी होत असून सध्या स्थितीत येथील पार्किंगचे दर दुचाकीला चार तासांसाठी ८. २६ रूपये, कार चार तासांसाठी १७. ७० रूपये असा आहे.
नो पार्किंग फलकच वाहनांच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 1:05 AM