जालना शहराची स्टील उद्योगामुळे देशभरात ओळख आहे. त्यातच वाढलेल्या शैक्षणिक संस्था, बाहेरगावहून कामासाठी येणे आदींमुळे शहरात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे शहराचा विस्तारही झपाट्याने होत आहे. शहरात नववसाहती निर्माण झाल्या आहेत; परंतु सदरील वसाहतींमध्ये सोयीसुविधा मिळत नसल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. काही वसाहतींमध्ये रस्ते नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. पावसाळ्यात तर रस्त्यावर चिखल झाल्याने मोठी कसरत करावी लागते, तर काही ठिकाणी नळ कनेक्शन नसल्याने पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. बहुतांश रहिवाशांनी नळपट्टी भरलेली असतानाही त्यांना पाणी मिळत नाही. नगरपालिकेने कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या सुरू केल्या आहेत; परंतु घंटागाड्या येत नसल्याने घराच्या बाजूलाच कचरा टाकावा लागत आहे. यामुळे दुर्गंधी पसरली असून, रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत अनेकवेळा पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले; पण याकडे लक्ष केले जात आहे.
रस्ता, पाण्याच्या समस्या कायम
नगर परिषद या भागातील रहिवाशांकडून कराची वसुली करते. मग आम्हाला सुविधा का पुरवत नाही, असा सवाल या भागातील रहिवाशांकडून केला जात आहे. मागील सहा वर्षांत येथे कुठलीच विकास कामे झाली नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात हा भाग चिखलमय होतो. या भागात साफसफाई होत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येते. नाल्या नसल्याने रहिवाशांना नाइलाजाने सांडपाणी रस्त्यावर सोडावे लागते. दुसरीकडे नळाला पाणी नसल्याने पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.
आम्ही मागील काही दिवसांपासून इंदेवाडी परिसरात राहतो. आमच्या वसाहतीकडे येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने मोठी गैरसोय होत आहे. त्यातच घंटागाडी येत नाही. घंटागाडी येत नसल्याने घराच्या बाजूलाच कचरा टाकावा लागत आहे. आमच्या वसाहतीकडे घंटागाडी पाठवावी.
-मुक्ता माने, इंदेवाडी परिसर
मागील काही वर्षांपासून शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे; परंतु म्हणाव्या तशा सोयीसुविधा नगरपालिका प्रशासनाकडून पुरविल्या जात नाहीत. आमच्या वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत अनेकवेळा निवेदने दिली; परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
-सागर कोकाटे, शिवनगर
शहरातील नववसाहतींमध्ये मुख्य समस्या ही रस्त्याची आहे. बहुतांश कॉलन्यांमधील रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून चालणेही अवघड झाले आहे. तर साफसफाई न होणे, कचरा न उचलणे, कचऱ्यामुळे पसरलेली दुर्गंधी, पाणी न येणे, नाल्या नसल्याने पाणी रस्त्यावर येणे आदी समस्यांना येथील रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे.