जालना : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरण जास्तीत जास्त व्हावे म्हणून सरकार प्रयत्नशील आहे, असे असताना जर या लसीची चोरी अथवा काळाबाजार होत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नसून, पोलीस आणि आमच्या यंत्रणेला कसून चौकशी करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope ) यांनी सोमवारी दिली.
टोपे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना स्थितीचा आढावा घेणारी बैठक पार पडली. या बैठकीत तिसऱ्या लाटेसंदर्भातील नियोजन आणि प्रशासनाची तयारी यावर त्यांनी मार्गदर्शन केले. या आढावा बैठकीत डेल्टा व्हेरिएंटबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. जालन्यात आजघडीला डेल्टाचा रुग्ण नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. परंतु गाफील न राहण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
औरंगाबाद येथील लसीच्या काळ्याबाजारासंदर्भात आपण दुपारीच आरोग्य विभागासह पोलिसांशी बोलून याची सविस्तर चौकशी करावी, त्यात कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कडक करवाई करण्याचे निर्देश यंत्रणेला दिल्याचे टोपे म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भाेसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींची उपस्थिती होती.
आठवड्याला सँपल पाठवाडेल्टा या विषाणूची लागण झाली आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी कोरोना रुग्णांचे सॅम्पल एनआयव्ही, पुणे या प्रयोगशाळेत दर पंधरा दिवसांनी पाठविले जात होते. परंतु आज झालेल्या बैठकीत टोपे यांनी हे सॅम्पल दर आठवड्याला पाठविण्याचे सांगितले. तिसरी लाट लक्षात घेऊन औषधींचा साठा, ऑक्सिजनची उपलब्धता यावरही त्यांनी सूचना दिल्या.