नाराज कोणीही नाही, ट्रिपल इंजिन सरकार जोरात काम करेल: रावसाहेब दानवे
By विजय मुंडे | Published: July 10, 2023 07:57 PM2023-07-10T19:57:44+5:302023-07-10T19:58:19+5:30
अजित पवारांच्या कार्यशैलीचा शासनाला लाभ
जालना : आमच्यावर घर फोडल्याचा आरोप करणाऱ्यांनी घर स्वत:कडे ठेवले आणि इतरांना बाहेर काढून दिले. त्यांच्या भाषेत आपण बोलणार नाही. परंतु, उद्धव ठाकरे यांनी खुशाल महाराष्ट्रात फिरावे, सभा घ्याव्यात, आमच्यावर काही परिणाम होणार नाही, अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. राज्यात ट्रिपल इंजिनचे सरकार आहे. आमच्यात कोणीही नाराज नाही. ट्रिपल इंजन सरकार जोरात काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जालना येथे सोमवारी ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपने घर फोडल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावर बोलताना दानवे म्हणाले, त्यांनी घर नाही फोडलं, पण घरातून बाहेर काढून दिले. राज ठाकरे घराबाहेर गेले, घर स्वत: ठेवले त्याचे काय, असा सवाल करीत भाजप ज्यावेळी इतर पक्षातील लोकांना पक्षात घेते त्यावेळी त्यांना भाजपाच्या धोरणानुसार चालावे लागते. भाजपात आल्यानंतर त्यांना वेडीवाकडी कामे करू दिली नाहीत. २३ पक्षांचे सरकार अटल बिहारी वाजपेयी यांनी चालविले. इतक्या पक्षाचे सरकार आम्ही यशस्वीपणे चालविले. त्यामुळे त्यांचे बोलणे म्हणजे ते उदास झालेले आहेत. पुढच्या काळात सत्ता मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे भाजपवर टीका करणे हे विरोधकांचे काम झाले आहे. आमच्यात कोणी नाराज नाही. कोणी चिंता करू नये. ट्रिपल इंजिनचे सरकार झाले आहे. जोरात लोड ओढेल. उद्धव ठाकरे यांनी खुशाल महाराष्ट्रात फिरावे, जागोजागी सभा घ्याव्यात, कोणताही परिणाम होणार नाही, असेही दानवे म्हणाले.
अजित पवारांच्या कार्यशैलीचा शासनाला लाभ
अजित पवार सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे, हे महाराष्ट्राला माहिती आहे. विकास कामे करण्याच्या त्यांच्या कार्यशैलीचा शासनाला आणि जनतेला लाभ होईल, असे सांगताना शिंदे गटातील कोणीही नाराज नाही आणि भाजपतील कोणीही नाराज होणार नाही, असेही रावसाहेब दानवे यांनी यावेळी सांगितले.