लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ग्रामपंचायतींना विना निविदा कामे देण्याच्या मुद्यावरून सोमवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा वादळी ठरली. सीईओ निमा अरोरा यांनी घेतलेल्या भूमिकेवरून सदस्य संतप्त झाले होते. २३ मार्च २०१५ च्या अध्यादेशाचा आधार देत अरोरा यांनी विना निविदा ३ लाखांवरील कामे देण्यास विरोध दर्शवला होता. मात्र, नंतरचे जे शुध्दीपत्र आले होते, त्या बद्दल खुद्द अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी मध्यस्ती करून अरोरा यांनी हट्ट सोडवा असे सांगितले. या मुद्यावरून सभा काही वेळासाठी तहकूब करण्यात आली होती.सोमवारी दुपारी स्व. यशवंतराव सभागृहात जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू झाली. सभा सुरू असतांनाच विद्यार्थ्यांचा किलबिलाट थेट सभागृहात ऐकण्यास मिळाल्याने सर्वजण अवाक झाले. २५ ते ३० विद्यार्थी थेट सभागृहाच्या व्यासपीठाजवळील रिकाम्या जागेत ठाण मांडून बसले. आम्हाला शिक्षक देण्याची मागणी त्यांनी उचलून धरली. थेट विद्यार्थी सभागृहात आल्याने शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला. नुकत्याच जिल्ह्यात शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत, त्यामुळे अनेक शाळांवरील शिक्षक रूजू होतांना काही तांत्रिक बाबींची अडचण असल्याचे सीईओ अरोरा यांनी मान्य केले. हे विद्यार्थी भोकरदन तालुक्यातील हिसोडा येथील जि.प. शाळेचे होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश फुके यांच्यासह अन्य जिल्हा परिषद सदस्य शालिग्राम म्हस्के, राहुल लोणीकर यांनीही शिक्षकांच्या बदल्यांसह मोडकळीस आलेल्या शाळाखोल्यांच्या मुद्यावरून अरोरा यांना धारेवर धरले. यावेळी ग्रामपंचायतींना कामे देतांना ती पूर्वीच्या अध्यादेशानुसार ई-निविदा काढल्यावरच द्यावेत असा जीआर होता.परंतु नंतर त्यात २१०८ मध्ये सुधारणा करून शुध्दीपत्रक काढल्याचे पदाधिकाऱ्यांनी अरोरा यांच्या लक्षात आणून दिल्यावर अरोरा यांनी आपला हट्ट मागे घेतला. तसेच यापुढे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना दहा ते १५ लाख रूपयांपर्यंतची कामे ही विना निविदा करण्यास मान्यता दिली. असे असेले तरी ज्यावेळी एक लाख रूपयांपेक्षा अधिकचे साहित्य खरेदी करायचे झाल्यास त्यांसाठी मात्र निविदा काढूनच ते खरेदी करण्याचा मुद्दा निमा अरोरा यांनी सभागृहात मांडून तो मंजूर करून घेतला.या एकाच मुद्या भोवती आज सर्वसाधारण सभा चार तास चालली. यावेळभ दुष्काळ, पाणी टंचाई, लांबलेला पाऊस यावर चर्चा होणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. यावेळी अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, सर्व विषय समित्यांचे सभापती आणि विभागप्रमुख उपस्थित होते. या सभेत गोंधळामुळे महिला सदस्यांना प्रश्न मांडता आले नाहीत्र.सभा : अध्यक्ष, उपाध्यक्षांचा पारा चढलाहिसोडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी सभागृहात दाखल झाल्याने अध्यक्ष अनिरूध्द खोतकर आणि उपाध्यक्ष सतीश टोपे हे जाम चिडले होते. यावेळी विद्यार्थ्यांसोबत आलेल्या पालकांना सभागृहात येऊन आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार नसल्याचे खोतकर म्हणाले.तर टोपे यांनी देखील अशीच रि ओढून बाहेरच्या सदस्यांना सभागृहता बोलण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. तसेच तुमचे प्रतिनिधी येथे मुद्दा मांडत आहेत. तुम्ही सभागृहा बाहेर जावे असे सांगितले. यामुळे विद्यार्थी व पालकांनी आम्हाला सभागृहातून अक्षरश: हुसकावून लावल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.अविश्वास पर्यंत मजलग्रामपंचायतींना कामे देण्याच्या मुद्यावरून मु्ख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी जी भूमिका घेतली. ती सदस्यांना मान्य नव्हती. परंतु यावर माघार घेण्यास अरोरा तयार नसल्याने बराच वाद निर्माण झाला.काही सदस्यांनी तर अरोरा यांच्याविरूध्द अविश्वास ठराव मांडवा असा आग्रह धरला. परंतु त्याला सर्वसंमती मिळाली नाही. त्यामुळे हा सदस्यांचा मनसुभा वास्तवात उतरला नाही. अनेक जिल्हा परिषद सदस्य हे विविध मुद्यावरून संतप्त झाले होते.
ग्रा.पं.ना मिळणार विना निविदा लाखाची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 1:08 AM